देवरी : आज लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत कित्येकांना तंबाखूचे व्यसन लागले आहे. तंबाखूच्या व्यसनामुळे देशाची युवा पिढी बरबाद होत आहे. अशात तंबाखूमुक्त समाज बनविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असून, समाजासाठी यांचा मोलाचा वाटा असल्याचेे प्रतिपादन सीमा सहषराम कोरोटे यांनी केले.
येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या वतीने प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात ‘नशा आणि तंबाखूमुक्त समाज’ या विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला आणि निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या स्पर्धेत वर्ग ५वी ते १०वीपर्यंतचे १३० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी तंबाखूमुक्त समाज यावर चित्रकला व निबंधांच्या माध्यमातून जनजागृती केली. यात, चित्रकला स्पर्धेत श्रुती राठोड, श्रुतिका हुमने, मेघा तावाडे, संचिता शेंदरे, संस्कृती लांजेवार, चेतन रुखमोडे यांना सन्मानित करण्यात आले. तर निबंध स्पर्धेत गुंजन भांडारकर, जीत ढवळे, प्राची आंबिलकर, आर्या रामटेके, रोहन मुंढे, गायत्री उके यांना सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. टेटे यांनी सीमा कोरोटे यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. प्रास्ताविक सरिता थोटे यांनी मांडले. सूत्रसंचालन सिद्धी थोटे यांनी केले. आभार गुंजन भांडारकर हिने मानले. कार्यक्रमासाठी ब्लॉसम पब्लिक स्कूलचे नितेश लाडे, विश्वप्रीत निकोडे, राहुल मोहुर्ले, सरिता थोटे, वैशाली मोहुर्ले यांनी सहकार्य केले.