संजय पुराम : साकरीटोल्यात विद्यार्थी घेणार डिजिटल शिक्षणाचे धडेसालेकसा : कोणत्याही विद्यार्थ्याच्या यशामागे शिक्षणाची प्रेरणा व परिश्रम लाखमोलाचे असते. तसेच त्या यशात पालकांची भूमिकासुध्दा तेवढीच महत्त्वाची ठरते. शिक्षकांनी दिलेले ज्ञानाचे धडे आणि आई-वडिलांनी घडविलेले संस्कार त्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याकडे सुरूवातीपासूनच लक्ष केंद्रीत करून त्याला योग्य दिशा देण्याचे काम करावे, असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले. ते साकरीटोला (झालिया) येथे डिजिटल शाळेचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करीत होते. पंचायत समिती सालेकसा अंतर्गत हिंदी प्राथमिक शाळा साकरीटोला (झालिया) या शाळेला गावकऱ्यांच्या लोकसहभागातून डिजिटल शाळा बनविण्यात आली. गावकऱ्यांनी शाळा डिजिटल करताना आपला असीम उत्साह दाखवित विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्याचा निर्धार केला, त्यात त्यांना यश आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेेंढे होत्या. उद्घाटक आ. संजय पुराम होते. अतिथी म्हणून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागोराव गाणार, माजी आ. भेरसिंह नागपुरे, जि.प. शिक्षण सभापती पी.जी. कटरे, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. सदस्य विजय टेकाम, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, झालियाचे सरपंच मनोज दमाहे, पं.स. सालेकसाचे माजी सभापती यादनलाल बनोठे, माजी जि.प. सदस्य मेहतर दमाहे, पं.स. सालेकसा गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, केंद्रप्रमुख डी.बी. चौधरी, संजय जोगी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत पदाधिकारी आणि अधिकारी यांची उपस्थिती तसेच दोन विद्यमान आमदार, एक माजी आमदार यांची उपस्थिती साकरीटोला गावाला भारावून टाकली. दुपारी ४ वाजता सुरु झालेला कार्यक्रम रात्री ८.३० वाजेपर्यंत अविरत सुरू राहिला. शिक्षक आणि पालकांसह गावकऱ्यांचा उत्साह बघत पाहुण्या मंडळींनीही मनमोकळेपणाने आपापले विचार मांडले. यावेळी माजी आ. भेरसिंह नागपुरे यांनी, जिल्हा परिषदेच्या शाळा कशा टिकवून ठेवता येईल यावर चिंतन मनन करण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमाबद्दल बोलताना, गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा ठरला, असे म्हटले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी आ. संजय पुराम यांनी शाळेला एक लाख रूपये अनुदान देण्याची घोषणा केली.
पालकांची भूमिका महत्त्वाची
By admin | Updated: September 12, 2016 00:26 IST