आमगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पाणी ठिकठिकाणी तुडंूब भरले आहे. या साचलेल्या पाण्याच्या निकासीसाठी नाल्या नाहीत. जुन्या मोडकळीस आलेल्या नाल्यांची साफसफाई होत नाही. रस्त्यावर घाण पसरली असून तेथूनच नागरिक ये-जा करीत आहेत. प्रशासकांच्या काळात हे चित्र असल्याने सर्वांना आश्चर्य व्यक्त करण्याची पाळी आली आहे. बाजाराच्या दिवशी जडवाहनांकरिता प्रतिबंध आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही मागील अनेक वर्षांपासूनची मागणी असूनही त्याची पूर्तता झालेली नाही. तसेच दोन जड वाहने समोरासमोर आल्यास बाजारातील अख्खी वाहतूकच तासनतास ठप्प पडते. वाहनांच्या या गर्दीत मग दुुचाकी किंवा सायकलस्वारच काय एखादी पायदळ व्यक्तीही त्यातून मार्ग काढून पुढे जाऊ शकत नाही. एवढी गंभीर अवस्था चारचाकी व जड वाहनांच्या आवागमनातून होत आहे. बाजारातील रस्त्यांवरच पाणी साचले असून भर रस्त्यांवरच पाण्याचे डबके तयार झाले आहेत. त्याच घाणीची भर पडत असून अशा या गलिच्छ वातावरणातून नागरिकांना वावरावे लागत आहे. पाय ठेवण्यास किळस येणार अशी स्थिती असूनही उपाय नसल्याने त्यातूनच लोकांना आपली वाट काढावी लागत आहे. यातही कहर करणारी बाब अशी की, या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे खड्ड्यांतील घाण पाणी नागरिकांच्या अंगावर उडून त्यांचे कपडे खराब होत आहे. यातूनच कित्येकदा भांडणाला कळ मिळत आहे. मात्र एवढ्यावरही बाजार समिती प्रशासनाकडून सफाई तर दुरच मात्र खड्यांत साधे मुरुम टाकण्याचेही औचित्य दाखवित नाही. प्रशासकांच्या राजवटीत असलेल्या या अव्यवस्थेमुळे नागरिक मात्र रोष व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
प्रशासकांच्या काळात रस्त्यांची दुर्दशा
By admin | Updated: July 13, 2015 01:36 IST