गोंदिया : कृष्णपुरा वॉर्ड ते रामनगर व कुडवाकडे जाणाऱ्या अंडरग्राऊंड मार्गावर एक मोठा खड्डा व अनेक लहान खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. आजपर्यंत शेकडो वाहनचालक जखमी झाले आहेत. त्यानंतरही कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही संबंधित विभाग झोपेत आहे.
कृष्णपुरा वाॅर्ड ते रामनगर व कुडवाकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वेचा अंडरग्राऊंड पूल आहे. या पुलाखालून शेकडो वाहनधारक पादचारी दररोज आवागमन करीत असतात. मात्र हे करताना त्यांना जिवाची भीतीदेखील तेवढीच आहे. वाटेत एक मोठा खड्डा व अनेक लहान खड्डे आहेत. हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. लक्ष विचलित झाल्यास अपघात निश्चित अशी परिस्थिती आहे. या खड्ड्यात पडून आजपर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. काहींना दवाखान्याचा रस्ता या खड्ड्यांनी दाखविलेला आहे. यापूर्वी कृष्णपुरा वॉर्डवासीयांनी अनेकदा या खड्ड्यांच्या डागडुजीकडे संबंधित रेल्वे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. परंतु हा विभाग अजूनही झोपेत आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुडवा लाईन येथील फाटक रेल्वे विभागाने बंद केले आहे. त्यामुळे अंडरग्राऊंड पुलाखालून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ज्यानुसार, आवागमन करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यानुसार दररोज अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे. रेल्वे प्रवासी, उद्योजक, शासकीय अधिकारी-कर्मचारी इतकेच नव्हे तर रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचेही कर्मचारी याच अंडरग्राऊंड मार्गाचा आवागमनासाठी उपयोग करीत आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोरदेखील खड्ड्यात पडून अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. मात्र त्यांना डागडुजीविषयी का कळत नसावे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
-----------------------
मोठ्या अपघाताची वाट
एखादा मोठा अपघात किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तरच विभागाला जाग येईल काय? असा प्रश्नदेखील कृष्णपुरा वॉर्डवासीयांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत या खड्ड्यांची डागडुजी व रस्ता व्यवस्थित न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे प्रचारमंत्री सतीश पारधी व कृष्णपुरा वॉर्डवासीयांनी दिला आहे.