मार्च अखेरच्या कामावर परिणाम : उपजिलाधिकाऱ्यांची तीन, नायब तहसीलदारांची १२ पदे रिक्त गोंदिया : महसूल विभागात आता आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा नियोजन समितीत मंजूर असलेली अनेक कामे रखडली असताना आता महसूल वसुलीचेही लक्ष्य पूर्ण करायचे आहे. मात्र दुसरीकडे या विभागात अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी, पटवारी यांचीही पदे रिक्त असल्यामुळे कामावर परिणाम होताना दिसत आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ संपण्यासाठी आता जेमतेम सव्वा महिना शिल्लक आहे. अशात कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे महसूल विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टेबलांवर फायलींचा गठ्ठा वाढत आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी खर्चाचा आढावा घेतला. त्यात खर्चाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे दिसून आले. त्यासाठी इतर अनेक कारणांसोबत अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे हेसुद्धा एक कारण आहे. अशा स्थितीत मार्च अखेरपर्यंत निधी खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पटवाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे महसूल वसुलीवर परिणाम झाला आहे. अ, ब आणि क वर्ग श्रेणीतील ५१७ पदांपैकी ७६ पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील उपअभियंता (जलसंधारण) रोहयो १, नायब तहसीलदार (ब श्रेणी) १२, कनिष्ठ अभियंता रोहयो १, सहायक लेखाधिकारी १, मंडळ अधिकारी ३, पटवारी १७ आणि कोतवालांची ३८ पदे रिक्त आहेत. यासोबतच उपजिल्हाधिकारी (सामान्य), उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तसेच अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी पद रिक्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) हे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त आहे. १६ एप्रिल २०१५ ला उपजिलाधिकारी लोणकर यांना या पदावरून कार्यमुक्त केले होते. उपजिल्हाधिकारी (सामान्य) हे पद गेल्या १२ महिन्यांपासून रिक्त आहे. उमेश काळे यांची बदली १८ फेब्रुवारी २०१६ ला झाल्यानंतर हे पद रिक्त झाले. ब श्रेणीतील नायब तहसीलदारांचे १२ पद रिक्त आहे. सहायक अधीक्षक (दंड) आणि नायब तहसीलदार रोहयो यांची पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदारांचेही पद रिक्त आहे. नायब तहसीलदार एस.वाय.रामटेके हे ३१ मार्च २०१६ ला कार्यमुक्त झाल्यानंतर हे पद भरण्यात आले नाही. अर्जुनी मोरगावमध्ये नायब तहसीलदार १, देवरीत ४, आमगावात १, सालेकसात १ पद रिक्त आहे. (जिल्हा प्रतिनिधी) अर्जुनीला कधी मिळणार एसडीओ? अर्जुनी उपविभाग झाल्यापासून तिथे आतापर्यंत कोणीही उपविभागीय अधिकारी नियमित राहिले नाही. अनेक दिवसपर्यंत या उपविभागाचे मुख्यालय अर्जुनीत ठेवायचे की सडक अर्जुनीत याबद्दल अनेक दिवसपर्यंत वाद सुरू होता. शेवटी उच्च न्यायालयाने अर्जुनीत मुख्यालय ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर आयएएस अधिकारी पृथ्वीराज यांची अर्जुनीचे एसडिओ म्हणून बदली झाली होती. मात्र त्यांनी अर्जुनीत येण्यास नकार देऊन परस्पर आपली बदली भंडाऱ्यात करून घेतली. त्यानंतर तिडके नामक अधिकाऱ्याची अर्जुनीसाठी नियुक्ती झाली. पण तेसुद्धा रुजू झाले नाही. त्यामुळे सध्या सडक अर्जुनीच्या तहसीलदारांकडे अर्जुनीच्या एसडिओंचा प्रभार आहे. नियमित एसडीओ मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनीच लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.
रिक्त पदांमुळे महसूल विभाग पांगळा
By admin | Updated: February 26, 2017 00:19 IST