गोंदिया : नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाच्या डोळ्यासमोर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून नक्षलवाद्यांशी संबंधित एकही घटना घडलेली नाही. मागील सहा महिन्याच्या काळात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीसारखे महत्वाचे कार्यक्रम झाले. तरीही नक्षल्यांचा मागमूस नाही. त्यामुळे नक्षल्यांच्या कारवायांना पूर्णपणे लगाम घालण्यात पोलिसांना यश आल्याचे बोलले जाते.या निवडणुकीतही नक्षलवाद्यांची कसलीही हालचाल न दिसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात पोलिसांची सतर्कता वाढली की नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाला, हे सांगणे कठीण आहे. मात्र सहा महिन्यात नक्षलवाद्यांची एकही घटना घडलेली नाही. महाराष्ट्रात गडचिरोलीनंतर गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून शासनाच्या रेकार्डवर आहे. मात्र लोकसभा व विधानसभा या दोन निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराच्या एकाही घटनेची नोंद नाही. साधे पत्रकही आढळल्याची माहिती नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचा नायनाट झाल्याचेही बोलले जाते. पोलिसांनी आपले कोबींग आॅपरेशन सतत सुरू ठेवले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना कसल्याही हालचाली करता आल्या नाही. परिणामी जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया घडल्या नाही. परंतु चालू वर्षात जानेवारी महिन्यात सालेकसा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये दोन चकमकी झाल्या. चिचगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एक स्फोटक जप्त करण्यात आले. एक मोटारसायकल नक्षलवाद्यांची असल्यामुळे ती गडचिरोली येथून जप्त करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बोरतलाव येथे निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे पत्रके निवडणुकीदरम्यान सापडली होती. मात्र गोंदिया जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान अशी काही पत्रके आढळली नाहीत. बंद दरम्यान नक्षलवाद्यांकडील वायर व पिट्टू, रिकामे साहित्य मिळाले होते.परंतु नक्षल चकमक मागील सहा महिन्यात झाली नाही. किंवा सहा महिन्याच्या काळात नक्षल समर्थकांनी आत्मसमर्पण केलेले नाही.
नक्षल्यांच्या कारवायांना लगाम
By admin | Updated: November 22, 2014 00:40 IST