सौंदड (रेल्वे) : तहसील कार्यालय सडक अर्जुनीतर्फे महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी कार्यक्रम सुवर्ण जयंती महा राजस्व अभियान संपूर्ण सडक अर्जुनी तालुक्यात राबविण्यात आला. या सुविधा शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सुविधा व समस्येचे निराकरण शिबिरस्थळी करण्यात आले.सदर शिबिर येथील तंटामुक्तीच्या सभागृहात घेण्यात आले. या शिबिरांतर्गत एक गाव एक साझा नुसार गावाचे चावडी वाचन उपस्थित नागरिकांसमोर करण्यात आले. सदर चावडी वाचन करीत असताना चावडी वाचनाच्या अंतर्गत गावातील ७ /१२ वाचन, आम आदमी बीमा योजनेच्या लाभार्थ्यांचे वाचन व सुटलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारणे, सं.गा.यो. श्रावणबाळ, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना इत्यादी लाभार्थ्यांचे वाचन करण्यात आले. मृत लाभार्थ्यांचे नावे कळविणे तसेच नवीन अर्ज स्विकारण्यात आले.यादरम्यान गावातील अंध व अपंग व्यक्तींची यादी तयार करण्यात आली. स्वस्त धान्य दुकानाचे वाटप नोंदवही व डी-१ नोंदवहीचे वाचन करण्यात आले. बी.पी.एल. धारकांचा शोध घेऊन मोफत गॅस जोडणी करीता अर्ज स्विकारण्यात आले. मृत खातेदारांचे नाव शोधून वारस फेरफार घेण्यात आले. बोझा गहाण नोंदवही घेणे, शर्तभंग प्रकरणाची तपासणी करण्यात आली. झाडांच्या नोंदी घेणे इत्यादी बाबी समाविष्ट करण्यात आल्या होत्या. या शिबिराचे सहायक अधिकारी म्हणून सौंदड साझ्याचे तलाठी एस.एम. पिंपळे व कार्यालयातील कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. याप्रसंगी नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
चावडी वाचन व गाव भेटीत समस्या निराकरण
By admin | Updated: September 6, 2015 01:45 IST