राजकुमार बडोले : महासमाधान शिबिरासाठी आढावा बैठक गोंदिया : शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. येत्या आॅगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महासमाधान शिबिरातून जवळपास ४० हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. गुरूवारी (दि.१४) गोरेगाव पंचायत समितीच्या बचत भवन येथे आयोजित महाराजस्व अभियानाअंतर्गत महासमाधान शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी गोरेगाव पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती बबलू बिसेन, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी हरिणखेडे, पंचायत समिती सदस्य जनबंधू, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य डॉ.लक्ष्मण भगत आदि प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाल्यास त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलण्यास मदत होईल. महासमाधान शिबिराच्या माध्यमातून गावपातळीवरील विविध लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. लाभार्थ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे एकत्र करु न अर्जासोबत भरु न दयावे. त्यामुळे लाभार्थ्याला योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल, असेही ते म्हणाले. सभापती चौधरी म्हणाले, महासमाधान शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. लाभार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज भरुन त्याला लाभ देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनीधींनी पुढाकार घेऊन शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले. डहाट म्हणाले, महसूल विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला महासमाधान शिबिराच्या माध्यमातून मिळाला पाहिजे यासाठी तलाठी, ग्रामसेवक व गावपातळीवरील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व शासनाच्या तालुका पातळीवरील विविध यंत्रणांनी स्वत:हून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पुढे यावे असे ते म्हणाले. सभेला तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, भूमि अभिलेखचे उपअधीक्षक मेश्राम, गटशिक्षणाधिकारी यशवंत तावडे, महावितरण कंपनीचे सहायक अभियंता भांडारकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीवास्तव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नाकाडे यांचेसह मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, तलाठी, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक व कोतवाल यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
४० हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा संकल्प
By admin | Updated: July 16, 2016 02:12 IST