ढेपाळलेपणा : विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचीही नाराजीगोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी ‘झेप.पी.’ म्हणजे खऱ्या अर्थाने झोलबा पाटलाचा वाडा असल्याचा प्रत्यय समितीच्या सर्व सदस्यांना आला. सभा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला मागील सभेतील ठराव व कार्यवृत्ताला मंजुरी देणे गरजेचे असते. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे सदस्यांना त्याची प्रतच उपलब्ध झाली नसल्याने सदस्यांनी ते मंजूर करण्यास ठाम नकार दिला.सभेच्या पाच दिवसांपूर्वी मागील सभेत झालेल्या ठरावाचे कार्यवृत्त, अनुपालन अहवाल सदस्यांना देणे गरजेचे आहे. मात्र ६ आॅगस्टला झालेल्या सभेचा अहवाल देणे तर दूर, सभेची नोटीस सुद्धा दिली जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपच्या काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रमेश अंबुले, सुरेश हर्षे यांनी हा विषय उचलला. त्यानंतर राकाँचे पक्षनेता गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर व इतर सदस्यांनीही या विषयावरून पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेवटी पुढील सभेपूर्वी कार्यवृत्त सदस्यांना देऊन पुढील सभेत ते मंजूर करण्याचे ठरले.या बैठकीत जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने काहीतरी उपाययोजना आखावी अशी विनंती काही सदस्यांनी केली. त्यावर काय करता येईल यावर विचार करण्याचे ठरले.राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी काही पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या विशेष इंटरेस्टवरून या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. आमगाव तालुक्यातील कट्टीपार ग्रामपंचायतमधील डिजीटल साहित्य खरेदी प्रकरणात हर्षे यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रत्यक्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवात त्यांच्यावरील आरोप निरर्थक असल्याचे स्पष्ट झाल्याने यावरून शिक्षण सभापतींना विरोधी सदस्यांनी टार्गेट केले. यावेळी चौकशी अहवाल वाचून दाखवा अशी मागणी गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर यांनी केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांनी ग्रामसेवकाला नोटीस पाठविण्यासोबतच सात दिवसाच्या आत कट्टीपार ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.विशेष म्हणजे एका हिंदी वृत्तपत्राने छापलेल्या बातमीत जि.प. केंर्द्रीय प्राथमिक शाळा कट्टीपारच्या मुख्याध्यापकांनी हर्षे यांनीच दिशाभूल केली, असा आरोप केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र त्या मुख्याध्यापकाने आपण कोणत्याही पत्रकाराशी या विषयावर बोलले नसल्याचे स्पष्टीकरण लिहून दिल्यामुळे त्यावरही चर्चा झाली. कोणीतरी राजकीय हेतूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
स्थायी समितीने फेटाळले मागील सभेचे ठराव व कार्यवृत्त
By admin | Updated: September 4, 2016 00:11 IST