गोंदिया : केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.२६) एक दिवसीय उपोषण करण्यात आले. याअंतर्गत उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील १२० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला, परंतु हे कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य केली नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा पाठिंबा असून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीनेही राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. तीन काळे कृषी कायदे व महागाईच्या मुद्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंद पाळला आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात येथील गांधी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन बुधवारी (दि.२६) सकाळी ११ ते सांयकाळी ४ या वेळेत जिल्हा मुख्यालयी पक्ष कार्यालयाजवळ अमर वराडे, अशोक गुप्ता, सूर्यप्रकाश भगत, जहीर अहमद, जितेश राणे,अलोक मोहंती, डॉ. योगेन्द्र भगत, जितेन्द्र कटरे, नटवरलाल गांधी, शैलेश जायस्वाल, प्रशांत लिल्हारे, रजित गणविर, प्रशांत लिल्हारे, चैनलाल रणगिरे, अरुण गजभिये, गंगाराम बावनकर, ब्रिजलाल पटले, राम चिखलोंडे, आंनद लांजेवार, दिलीप गौतम, नरेश लिल्हारे, ममता झगडे, अनिता मुनेश्वर, विश्वेश्वर लिल्हारे, दलेश नागदेवे, मनिष चव्हाण, निलम हलमारे, रमेश लिल्हारे, लखन नाईक, कृष्णा विवट, नफीस सिध्दीकी, नाईक, विनोद बरोंडे, अहमद सय्यद, अभिषेक जैन, नियाज शेख, अफसर खान, बलजित बग्गा, अमर राहुल आदी उपोषणाला बसले होते.
...........
याकडे वेधले लक्ष
पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळया लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८८० रुपयांवर गेले आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे.