गोंदिया : प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने नव्या योजनांसह काही जुन्या योजनांचे नूतनीकरण केले आहे. प्रवाशी वाढवा अभियानांतर्गत एसटी महामंडळाने नव्याने लागू केलेल्या योजनांमध्ये प्रवाशांची आर्थिक बचत होणार असून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही या योजनांचा फायदा होणार आहे. प्रवासी वाढवा अभियानांतर्गत येणाऱ्या वार्षिक सवलत कार्ड योजना, वार्षिक सवलत कुटुंब कार्ड योजना, कर्मचारी कल्याण योजना याबाबत महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाने घेतला आहे.२प्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने नव्या योजनासह काही जुन्या योजनांना नवीन रूप दिलो आहे. २०० रुपयाच्या वार्षिक सवलत कार्ड योजनेमध्ये सुधारणा करुन पूर्वीची किमान १८ कि.मी.प्रवासाच्या अंतराची अट रद्द केली आहे. तसेच कार्ड नूतनीकरणाचे दर कमी केले आहेत. कार्डच्या प्रथम नूतनीकरणासाठी १५० रुपये दर नव्याने लागू केले आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशाला प्रवासाच्या तिकिटामध्ये १० टक्के सवलत मिळणार आहे. वरून १.५ लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे.५०० रुपयांची वार्षिक सवलत कुटुंब कार्ड योजना नव्याने सुरू केली असून चार व्यक्तींच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वर्षाभरातील प्रवासी भाड्यात १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या बसेससाठी ही योजना लागू होणार आहे. तसेच शिवनेरी बससाठी ५०० रुपये मूल्याच्या वार्षिक सवलत कार्ड योजनेंतर्गत प्रवाशांना ५ टक्के सुट देण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.कर्मचारी कल्याण योजनेंतर्गत कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातामुळे चालक-वाहक व यांत्रिकी कर्मचारी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र होऊन महामंडळाच्या सेवेतून कमी केल्यास त्यांच्या एका अवलंबितास अनुकंपा तत्वावर नेमणूक देण्याचा निर्णय झाला आहे. याचा फायदा रा.प. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. तसेच वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या किंवा निवृत्ती घेतलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा/विदूर यांना वर्षातून दोन महिन्यांचा मोफत पास देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. या सर्व योजनांसाठी स्मार्ट कार्ड पद्धत अवलंबली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
एसटीने केले योजनांचे नूतनीकरण
By admin | Updated: September 27, 2014 01:54 IST