गावकऱ्यांची अवैध वसुली : फ्लार्इंग स्कॉडचे साटेलोटे? देवरी : महाराष्ट्राचा सीमेवर असलेल्या सिरपूर चेकपोस्ट समोरूनच गैरमार्गाने ओव्हरलोड प्रकारची वाहतुक ग्रामीण क्षेत्रातुन होत असल्याने चंदीटोला, मकरधोकडा, पदमपूर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. दरदिवशी शेकडो ट्रक आरटीओच्या नजरेच्या समोरून जात आहेत. तरीसुध्दा अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. चंदीटोला, मकरधोकडा, पदमपूर ते बागनदी पुलाजवळील चार-पाच किमी. अंतराच्या रस्त्यावरून अधिक क्षमतेचे भार घेऊन ट्रकांची सर्रास ये-जा सुरू आहे. या अतिक्षमतेच्या ट्रकांना पार करण्याकरिता काही दलाल सक्रिय झाले आहेत. पदमपूर,मकरधोकडा, चंदीटोला व सुधरीटोला या गावातील गावकरी सुध्दा ट्रकचालक व दलालाकडून प्रति ट्रक १०० रुपये वसूल करीत आहेत. प्रत्यक्ष या रस्त्याला भेट दिली असता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत मकरधोकडा ते चंदीटोला या दिड किमी अंतराचे निर्मिती २०१२ रोजी अंदाजित २३ लाख रक्कम खर्च करण्यात आली होती. परंतु आता ओव्हरलोड ट्रकांची ये-जा सुरू असल्याने जागोजागी रस्ता उघडलेला आहे. तसेच रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. जागोजागी मकरधोकडा, चंदीटोला, पदमपूर गावातील ग्रामस्थ ट्रकांची चौकीदारी करून प्रति ट्रक १०० रुोये वसूल करीत आहे. याबाबत गावकऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गावातील मंदिराच्या निर्माणाकरीता आम्ही ट्रकचालकांकडून पैसे वसूल करीत आहेत. रस्त्याच्या दुर्दशाबद्दल विचारले असता त्यांनी ते म्हणाले की, रस्त्याशी आम्हाला काही घेण-देण नाही. देवरी पोलीस सुध्दा रात्रीच्या वेळी येऊन ट्रक पार करीत आहेत. ८ पोलिसांनी गावकऱ्यांना हक्काची अडवणूक केल्यास कारवाई करण्याची धमकी दिल्याचे सांगितले. याबाबत आरटीओ चेकपोस्ट प्रभारी प्रमोद खैरकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, चेकपोस्टला चुकवून गैरमार्गाने प्रतिदिन शेकडो ट्रक पदमपूर, चंदीटोला, मकरधोकडा मार्गाने जात आहेत. याला त्या गावातील गावकरी जवाबदार आहेत. तसेच गोंदिया आरटीओच्या भरारी पथकाची जवाबदारी आहे. चेकपोस्टच्या बाहेर निघून या ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नाही. आता यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सिरपूर येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी (राजस्व) देवरी व तहसीलदार देवरी यांच्याकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने सिरपूर येथे चेकपोस्टची निर्मिती केली आहे. जेव्हापासून या चेकपोस्टची निर्मिती झाली तेव्हापासून शासनाचा राजस्वसुध्दा वाढलेला आहे. परंतु मागील काही महिन्यापासून आरटीओची नजर चुकवून अवैध मार्गाने ओव्हरलोड वाहन जात असल्याने दररोज शासनाचा लाखोचा राजस्व बुडत असल्याचे चित्र आहे. देवरी चेकपोस्टची नजर चुकवून ओव्हरलोड वाहन जात असले तरी, गोंदिया फ्लार्इंग, भंडारा आरटीओ व फ्लार्इंग व नागपूर आरटीओ गप्प का? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
दररोज बुडतो लाखोंचा महसूल
By admin | Updated: December 13, 2015 01:57 IST