आमगाव : आमगाव ग्रामपंचायतअंतर्गत नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासन निधीअंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आल्या. परंतु ४८ गावांच्या बनगाव प्रादेशिक योजनेला समाविष्ट करण्याच्या घाईत या योजनेचे अपूर्ण बांधकाम असताना लोकार्पण सोहळा आटोपून घेण्यात आला.आमगाव येथील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून यशस्वीपणे सुरू आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी शासनाने आमगाव येथे जलशुध्दीकरण सयंत्राची व्यवस्था केली. त्यामुळे नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. वाढत्या लोकसंख्या प्रमाणात नागरिकांना पाण्याच्या टंचाईला समोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी जास्त क्षमता असलेल्या जलकुंभासह योजनेची मागणी केली. शासनाने या योजनेला मंजुर करून सन २०१२ ला १ कोटी ७० लाख ७७ हजार ८५५ रुपयांच्या निधीची तरतुद करून दिली. सदर योजनेमुळे आमगाव शहरातील नागरिकांना पूर्वीपेक्षा ५० हजार लिटर पणी अधिक मिळणार आहे. सदर पाणी वाढत्या लोकसंख्येला पूर्वीच कमी पडत आहे. परंतु योजनेचे राजकारण करित काही पदाधिकाऱ्यांनी भांडवल केले. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट करण्यात येणाऱ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला नागरिकांचा विरोध असताना सुध्दा आमगाव शहराचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला आहे. सदर वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत लोकार्पण सोहळ्यापर्यंत कामे झाली आहेत. लोकार्पण दिवसाच्या रात्रीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरूच होते. अनेक ठिकाणी टाकलेली वाहिनी फुटली असल्याने पाणी पुरवठा खंडीत होणे सुरू असताना अपूर्ण बांधकाम असलेल्या योजनेचे लोकार्पण उरकुन टाकले. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
अपूर्ण बांधकाम असलेल्या पाणी योजनेचे लोकार्पण
By admin | Updated: August 30, 2014 01:50 IST