सुकडी-डाकराम : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणीकरण करण्याबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने तिरोडा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना सूचित करण्यासाठी तिरोडा विधानसभा व तिरोडा तालुक्यातील राजकीय पक्षांची सभा तिरोडा तहसील कार्यालयामध्ये पार पडली.तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रविण महिरे यांनी सभा आयोजित केली. या वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राधेलाल पटले, दलित आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र जांभुळकर, तिरोडा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष छबीलाल पटले, भाजपचे जिल्हा महासचिव खडकसिंग जगणे, राष्ट्रीय काँग्रेसचे मोरगाव-अर्जुनी विधानसभा प्रमुख विशाल शेंडे व इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. संबंधित मतदारांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून करून घ्यावी. ज्या मतदारांचे नाव मतदार यादी आहेत, परंतु छायाचित्र नाही अशा मतदारांनी आपले नजीकच्या काळातील छायाचित्र संबंधित मतदान केंद्रीय अधिकाऱ्यांना द्यावे, ज्या मतदाराचे नाव दुरूस्ती करावयाचे असेल अशा मतदारांनी आपले नाव दुरूस्तीसाठी संबंधित बीएलओ यांच्याकडे नोंदवावे. मृत्यू पावले असेल तर त्यांचे नाव मतदार यादीमधून वगळावे आणि बाहेरगावी मतदार राहत असेल अशाचेसुध्दा नाव मतदार याद्यांमधून कमी करावे.सदर कार्यक्रम विहित मुदतीकरिता असल्यामुळे मतदारांनी तातडीने आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून सदर बाबी तपासून खात्री करून घ्यावी, असे सभेमध्ये सांगण्यात आले. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी केले. (वार्ताहर)
याद्यांचे शुद्धीकरण व प्रमाणीकरण करा
By admin | Updated: April 8, 2015 01:34 IST