गोंदिया : रेतीची तुटलेली पार्टनरशिप आणि रखडलेल्या आर्थिक व्यवहाराला घेऊन शहराच्या रिंगरोडवरील सहयोग हॉस्पिटल परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका युवकाची हत्या करण्यात आली. हा हल्ला करणारे चार आरोपी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रविप्रसाद राधेलाल बंभारे (३५) रा. लोधीटोला असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
आशिष बघेले व लोकेश बघेले यांचा अपघात झाल्याने त्यांना सहयोग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रविप्रसाद बंभारे व मुनीम राहुल ठकरेले रा. धापेवाडा गेले होते. सहयोग हॉस्पिटलसमोर श्याम ऊर्फ पी.टी. चाचेरे त्याचे साथीदार शुभम परदेशी, प्रशांत भालेराव ऊर्फ कालू मातादिन व शाहरुख शेख हे श्याम चाचेरे याच्या स्कॉर्पिओ क्रमांक एम.एच. १४ वाय. ७७७७ या गाडीने रवीला गाडीने धडक दिली. नंतर गाडीतून उतरून तलवार, गुप्ती, चाकूने सपासप त्याच्यावर १५ ते २० घाव मारले. रविप्रसाद बंभारे हा ३ वर्षापासून रेती पुरवठ्याचे काम करीत होता. चार ते पाच महिन्यांपूर्वी पी.टी. चाचेरे याच्या सोबत मिळून भागीदारीमध्ये रेतीचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु रेतीच्या हिशेबातील पैशावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे नोंव्हेबर महिन्यापासून रविप्रसाद हा एकटाच रेतीचा व्यवसाय करीत होता. चार दिवसापूर्वी पी.टी. चाचेरे याने रविप्रसाद याला फोन करून धमकी दिली होती. १४ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास रविप्रसाद याच्या पोटावर व शरीरावर अनेक ठिकाणी घाव घालण्यात आले. सपासप वार केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. घटनेची वार्ता शहरात झपाट्याने पसरली. या संदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचे छायाचित्र हॉस्पिटलच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीने कैद केले आहे. आरोपींना राग एवढा होता की त्यांनी धारदार शस्त्राने १५ ते २० घाव त्याच्यावर घातले. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचे तपासी अधिकारी ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी सांगितले. आतापर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.