गेल्यावर्षीपेक्षा चांगली स्थिती : आतापर्यंत जिल्ह्यात ३६५.३ मि.मी. पाऊस गोंदिया : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात दररोज न चुकता हजेरी लावणाऱ्या पावसाने आणि दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने तहानलेल्या जलाशयांना तृप्त केले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी १२ जुलैला मोठ्या धरणांमध्ये जेवढा पाणीसाठा होता त्यापेक्षा यावर्षी जास्त आहे. जेमतेम जुलै महिना अर्धाही संपलेला नसताना निर्माण झालेली ही स्थिती सर्वांना दिलासा देणारी ठरत आहे. १ जूनपासून १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३६५.३ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या २५ टक्के पाऊस आता झाला आहे. पावसाची ही कृपा अशीच राहिल्यास यावर्षी सर्व मोठी जलाशये १०० टक्के भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जून महिन्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांना तोंडचे पाणी पळाले होते. अनेक ठिकाणी भाताची नर्सरी वाया जाण्याची स्थिती होती. परंतु जुलै महिना शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित करणारा ठरत आहे. गेल्यावर्षी कमी पावसामुळे चारही मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे रबी हंगामात शेतकऱ्यांना धरणांचे पाणीही मिळू शकले नाही. त्यामुळे सर्वच छोटी-मोठी जलाशये तहानलेली होती. गेल्या आठवडाभरातील पावसामुळे त्यात २० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय १० मध्यम प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तहानलेल्या जलाशयांना पावसाने केले तृप्त
By admin | Updated: July 13, 2016 02:23 IST