ग्राहक मंचचा न्यायनिवाडा : दोन प्रकरणांत प्रत्येकी १५ हजार नुकसानभरपाईगोंदिया : प्रवाशांनी केलेल्या आरक्षणाबाबत रेल्वे विभागाने केलेल्या हलगर्जीपणामुळे व सेवेतील त्रुटीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतल्याने रेल्वेला हलगर्जीपणा करणे महागात पडले. दोन्ही प्रकरणात रेल्वेला भुर्दंड सहन करावा लागला.पहिल्या प्रकरणातील तक्रारकर्ते अॅड. प्रमोदकुमार अग्रवाल रा.गोंदिया यांनी त्यांची मुलगी रशा हिच्यासाठी १७ आॅगस्ट २०१४ रोजी वैनगंगा एक्सप्रेसचे तिकीट गोंदिया ते सिकंदराबादकरिता १५ आॅगस्ट २०१४ रोजी तत्काळ आरक्षण सुविधेअंतर्गत इंटरनेटद्वारे बुकींग केले होते. त्यावेळी आरक्षणाची स्लिपरची ३० तिकिटे शिल्लक होती. अग्रवाल यांनी इंटरनेट बँकिंग सेवेतून आपल्या खात्यातून ४७६.२४ रूपये रेल्वेला जमा केले. मात्र इंटरनेट बँकिंग सेवेतून प्रयत्न अयशस्वी झाल्याने तसा त्यांना संदेश आला. पुन्हा त्यांनी नव्याने प्रयत्न केल्यावर त्यांना वेटिंग लिस्टचे तिकिट मिळाले. इंटरनेटद्वारे बुकिंग सेवेचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे रेल्वेने अग्रवाल यांच्या बँक खात्यात त्यांची रक्कम १९ आॅगस्ट २०१४ रोजी जमा केली. सदर घटनेत रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा व सेवेतील त्रुटीमुळे अॅड. अग्रवाल यांची मुलगी वैनगंगा एक्सप्रेसने गोंदिया ते सिकंदराबाद प्रवास करू शकली नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक न्यायमंचात धाव घेतली.दुसऱ्या प्रकरणात तक्रारकर्ते प्रतिक सुधीर राठोड रा. गोंदिया यांनी रायगड ते पुणे प्रवासासाठी दोन व्यक्तींकरिता आझाद हिंद एक्सप्रेसचे वातानूकुलित प्रवासाचे तिकीट १८ नोव्हेंबर २०१२ रोजी इंटरनेटवरून काढले. सदर गाडीने ते रायगडवरून प्रवास करणार होते. मात्र ५ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांना वैयक्तिक कारणामुळे रायगडऐवजी गोंदिया येथून प्रवास करावयाचा होता. तसा अर्जसुद्धा त्यांनी गोंदिया रेल्वे कार्यालयात दिला. यानंतर त्यांनी इंटरनेटवर तिकिटाची तपासणी केली असता रायगड ते पुणे अशाच प्रवासाचा उल्लेख आढळला. त्यांनी त्वरित गोंदिया रेल्वेच्या कार्यालयात संपर्क केला. यावर रेल्वे विभागाने चूक मान्य करून रायपूर व बिलासपूर येथील रेल्वे विभागाला कळविले.मात्र प्रवासाच्या दिवशी १८ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांनी गोंदियावरून प्रवासाला सुरूवात केल्यावर टी.सी.ने त्यांनी रायगड येथून प्रवासाला सुरूवात केली नसल्याने त्यांचा बुक झालेला बर्थ दुसऱ्याच प्रवाशाला दिल्याचे समजले. त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाने प्रतिक राठोड यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली.जिल्हा ग्राहक मंचाने दोन्ही प्रकरणातील युक्तीवाद ऐकला. त्यात रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा व सेवेतील त्रुटी मान्य केली. तसेच दोन्ही प्रकरणातील दोन्ही तक्रारकर्त्यांना नुकसान भरपाई म्हणून रेल्वेने प्रत्येकी १५ हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी पाच हजार रूपये ३० दिवसात द्यावे, असा आदेश न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी दिला. रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास त्या प्रकाराला रेल्वे विभाग दोषी असताग हे प्रवाश्यांच्या लक्षात येत असल्याने ते ग्राहक न्यायालयात धाव घेतात. (प्रतिनिधी)
रेल्वे प्रशासनाला भोवला हलगर्जीपणा
By admin | Updated: August 10, 2015 01:27 IST