व्यवसाय २० वर्षांपासून : एका दिवशी फिरतो १५ ते २० गावेबाराभाटी : दारिद्र्याच्या परिस्थितीतही स्वाभिमानाने आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर बऱ्यापैकी जीवन कसे जगावे, याचा आदर्श येथील राहुल कऱ्हाडे या युवकाने घालून दिला आहे. येणाऱ्या अनेक समस्यांमुळे मन गोंधळून जात असताना हिंमत न हारता विविध मार्गाचा अवलंब करून शेवटी जीवनाच्या उंबरठ्यावर आईस्क्रीम-कुल्फीचा आधार घेत स्वत:च्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न तो करीत आहे. त्याची ही जिद्द समाजासाठी सन्मानाने जगण्याची प्रेरणा देत आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथील रहिवासी राहुल जगन कऱ्हाडे (३६) हा युवक स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी २० वर्षांपासून आईस्क्रीम-कुल्फीचा व्यवसाय करीत आहे. बारावी नापास झाल्यानंतर स्वत:च्या नशिबावर कुढत न बसता कुटुंबाला सावरण्यासाठी त्याने हा व्यवसाय सुरू केला.राहुल एका दिवशी दररोज १५-२० गावे फिरून कधी रेल्वे स्थानक तर बस स्थानक तर कधी खेड्यापाड्यामध्ये तब्बल १० वर्षांपासून दिसत आहे. तो आजू-बाजूच्या गावांमध्ये कुल्फीवाला राहुल म्हणून प्रसिध्द आहे. या व्यवसायाच्या जोरावर राहुलने निवासासाठी सुबक घर बांधले. स्वत:ला इतर वेळी फिरण्यासाठी मोटारसायकल घेतली. पण कुल्फी विकण्यासाठी तो आजही सायकलवरच गावोगावी फिरतो. त्या भरवशावर सर्व संसार चालत आहे, असेही राहुुलने सांगितले. राहुल निर्व्यसनी असून तो सिझनेबल व्यवसाय करतो. तो बाराभाटी, कुंभीटोला, ब्राह्मणटोला, येरंडी, देवलगाव, डोंगरगाव, कवढा, बोळदे, सुकळी, खैरी, सुरगाव, चापटी, खांबी, पिंपळगाव असा परिसरातील गावांत फिरून आपला व्यवसाय करून दररोज जवळपास ४०० ते ५०० रुपये गोळा करतो. त्यातूनच त्याने बेरोजगारीवर मात करून इतरांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे. (वार्ताहर)
उदरनिर्वाहासाठी राहुलला आईस्क्रीम-कुल्फीचा आधार
By admin | Updated: May 27, 2015 01:05 IST