गोंदिया : गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील तंटे मोठ्या प्रमाणात कमी झाले. परंतु गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे सर्वेक्षण केल्यावर जिल्ह्यातील ५४७ पैकी २७६ तंटामुक्त गावात भांडण झाल्याचे लक्षात आले.
राज्य शासनाने १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे १० लाखावरील तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. आता या मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. या मालिकेत गोंदिया जिल्हा राज्यातील पहिला तंटामुक्त होणारा जिल्हा म्हणून नावारूपास आला. राज्यातील १६ हजार पेक्षा अधिक गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी ठरलेली गावे खरच तंटामुक्त आहेत का? या गावात तंटे झाले का? याचे सर्वेक्षण राज्यभरात पोलीस विभागातर्फे करण्यात आले. तंटामुक्त सेलला मागितलेल्या सर्वेक्षणात अजूनही जिल्ह्यातील तंटामुक्त गावात तंटे उद्भवत असल्याची माहिती पुढे आली आहे.
............
जिल्ह्यातील तंटामुक्त गावे ५४७
............
तालुका- तंटामुक्त गावे - सन २०१९ मधील तक्रारी - सन २०२० मधील तक्रार
आमगाव -५७- ७-५
अर्जुनी-मोरगाव-७०-२४-३
देवरी-५५- २४- १४
गोंदिया-११०- ५०-३१
गोरेगाव- ५६- ३६- १२
सडक-अर्जुनी-६३-२६-१०
सालेकसा-४१ -२४-६
तिरोडा-९५-४८- २४
एकूण-५४७-२७६ -१२३
..................
कोट
तंटामुक्त अध्यक्षांचे
तंटामुक्त झालेल्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार वाटले. मात्र त्या गावांना तंटामुक्त गाव झाल्याचा पुरावा म्हणून शासनाने त्या गावांना सन्मानपत्र देण्यात आले नाही. नक्षलग्रस्त गावातही लोकचळवळ समित्यांनी उभी केली. ही गावे सुद्धा तंटामुक्त झाली परंतु ते सन्मानपत्रापासून वंचित आहेत.
भरत भांडारकर, तंटामुक्त अध्यक्ष बोथली.
..........
राज्यातील गावांची सन २०१४-०१५ ते सन २०१८-१९ या पाच वर्षातील तंटामुक्त गावांची यादी प्रकाशित केली नाही. या मोहिमेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी काम करणाऱ्या गावांना पुरस्कार दिले नाही. भाजप सरकारने दुर्लक्ष केले होते. परंतु आता या योजनेकडे राष्ट्रवादीचेही सरकार दुर्लक्ष करीत असल्याने मोहीम राबविणाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.
- हनिफ शेख, तंटामुक्त अध्यक्ष पदमपूर.
..........कोट
तंटामुक्तीला आता लोक तेवढे महत्व देत नाही. सुरुवातीचा तंटामुक्तीचा असलेला जोर कमी झाल्याने आता वाद गावात न सोडविता सरळ पोलीस ठाण्यात पोहचत आहेत. गावातील वाद गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त माेहीम ही महत्त्वाची ठरत होती. परंतु या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याने वाद वाढले.
-जी. आर. नागपुरे, नायब तहसीलदार, तिराेडा
.........
गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने उत्तम कार्य केले. वर्षाकाठी लाखो तंटे सामोपचारातून सुटले. या मोहिमेने गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी गावात लोकचळवळ उभी केली. या मोहिमेने पोलिसांच्या व न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी केला. ही मोहीम जाेमाने राबविण्याची गरज आहे.
-महेश बन्सोडे, ठाणेदार गोंदिया शहर.
.....