गोंदिया : दिवाळीसाठी मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली धावपळ अखेर बुधवारी (दि.११) संपली. फटाक्यांच्या धमाक्यात दिवाळीचा सण निघून गेला, मात्र आताही बाजारात गर्दी कायमच आहे. ही गर्दी आहे ती ग्रामीण भागातील नागरिक व भाऊबिजेसाठीची. यात फुटपाथवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असून मोठमोठे शोरूम मात्र आता रिते दिसून येत आहेत. पगारदार वर्ग व व्यापाऱ्यांमुळे आतापर्यंत बाजारपेठ गजबजून गेली होती. नवरात्रोत्सवा नंतर लगेच या वर्गाकडून दिवाळीच्या तयारीला सुरूवात झाल्याचे बाजारातील गर्दीवरून दिसून येत होते. हाती पैसा असल्याने त्यांनी नवरात्रीनंतरच्या १५ दिवसांत व दिवाळी दिवसापूर्वी पर्यंत आपली खरेदी करून दिवाळी साजरी केली. या वर्गाकडून खरेदी होत असल्याने शहरातील मोठे शोरूम गर्दीने खचाखच भरलेले दिसून येत होते. दिवाळीच्या या धामधूमीत कोट्यवधींची उलाढाल येथील बाजारपेठेत दिसून आली. यात धनत्रयोदशीसाठी सोन्याचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स साहीत्य, दुचाकी-चारचाकी वाहन व अन्य वस्तूंचा समावेश करता येईल. त्यानंतर दिवाळीसाठी कपडे व फटाक्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. येथील बाजारपेठ परिसरातील प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने शहरातीलच काय तर लगतच्या परिसरासह राज्यातीलही नागरिक येथून खरेदी करतात. या विशिष्ट वर्गाकडून खरेदी झाल्याने व्यापाऱ्यांचीही दिवाळी चांगलीच राहिली. आता दिवाळी सरली असली तरिही बाजारात गर्दी दिसून येत आहे. मात्र आता आहे ती गर्दी आहे ती आता हाती पैसा लागला अशा वर्गाची. दिवाळी पर्यंत कित्येकांना त्यांचा पगार किंवा मजूरी मिळाली नाही. परिणामी त्यांची खरेदी आता हाती पैसा आल्यावर होत असून जेमतेम परिस्थिती असलेल्या या वर्गाकडून आता खरेदी केली जात असल्याने मोठे शोरूम ओस पडले असून येथील फुटपाथवर मात्र चांगलेच गजबजलेले दिसत आहे. शिवाय भाऊबिजेला भावाला देण्यासाठीही बाजारात खरेदी होत असून मोठ्या दुकानांत एक-दोनच ग्राहक दिसत आहेत. मात्र दिवाळी सरली असली तरिही बाजारात गर्दी दिसूनच येत आहे. (शहर प्रतिनिधी)
आता वाढली भाऊबिजेची खरेदी
By admin | Updated: November 13, 2015 01:51 IST