गोंदिया : धान खरेदीचा तिढा सुटल्यानंतर जिल्ह्यात धान खरेदी केंद्र उघडण्यास सुरूवात झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशनचे १४ तर आदिवासी विकास महामंडळाचे ३२ केंद्र उघडण्यात आले आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत एकूण १३ हजार १७२ क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती आहे. मात्र आतापर्यंत दोन्ही संस्थांचे २६ केंद्र उघडण्यात आलेले नसल्याने धान खरेदी प्रभावीत होत आहे.जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदी केली जाते. आतापर्यंत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना पडक्या दरात धान व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीत विकावे लागत होते. यामुळे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सर्वच स्तरातून ओरड सुरू होती. अखेर शासकीय धान खरेदीचा मुहूर्त सापडला व आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यास हिरवी झेंडी मिळाली. त्यानुसार मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने आपले धान खरेदी केंद्र सुरू करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत बघावयाचे झाल्यास, जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशनचे १४ धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. दरवर्षी फेडरेशन ४० केंद्र उघडत असून त्यानुसार २६ केंद्र उघडायचे आहेत मात्र १७ नोव्हेंबर रोजी सालेकसा येथे एक तर सडक अर्जुनी येथे दोन केंद्र सुरू झाल्याने आणखी २३ केंद्र उघडायचे आहेत. या १४ केंद्रांवर दोन हजार २११ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाने अद्याप ३२ केंद्र उघडले असून ३५ केंद्रांची मंजूरी असल्याने त्यांचे तीन केंद्र शिल्लक आहेत. महामंडळांच्या या केंद्रांपैकी २९ केंद्रांवर धान खरेदी सुरू असून त्यावर १० हजार ९६१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)
४६ केंद्रांवर १३ हजार क्विंटल धान खरेदी
By admin | Updated: November 17, 2014 22:56 IST