देवरी : भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि.२१) भाजप कार्यालयाच्या मैदानावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५०० महिलांनी सहभाग नोंदविला. यानिमित्त मकर संक्रांतीच्या पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण व स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली.
अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष देवकी मरई होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सदस्य रचना गहाणे, प्रदेश सदस्य सविता पुराम, माजी नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, गोमती तितराम, नूतन कोवे, प्रज्ञा संगीडवार, सरिता रहांगडाले, माया निर्वाण, कांता भेलावे आदी उपस्थित होते. याप्रसंगी गहाणे यांनी, महिलांवर वाढलेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करीत महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. पुराम यांनी, ५० टक्के आरक्षणाबाबत बोलताना महिलांनी राजकारणात सहभाग घेऊन समाजकारण करण्याचा सल्ला दिला, तर मरई यांनी, महिलांना संघटित राहण्याचा सल्ला दिला. यावेळी महिलांची उखाणे स्पर्धा घेऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आले. महिलांनी एकमेकांना हळदीकुंकू लावून संक्रांतीचे वाण दिले. संचालन सुनंदा बहेकार यांनी केले. आभार अंबिका बंजार यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाजप महिला मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.