तिरोडा : कोरोनामुळे सलून व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशात त्यांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी नाभिक समाज संघटनेने केली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनातून कोरोनाच्या नावावर सलून सायंकाळी ४ वाजता बंद करावे लागत आहे. शिवाय शनिवारी व रविवारी पूर्ण बंद ठेवावे लागत आहे. ही अट त्वरित हटवून सलून नियमितपणे सुरू करण्यात यावे, नाभिक समाजाच्या उत्थानासाठी केश शिल्पी महामंडळाची स्थापना करण्यात यावी. नगरपालिका, महानगरपालिका तथा ग्रामपंचायत क्षेत्रात बनविल्या जाणाऱ्या सरकारी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नाभिक समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावर दुकाने उपलब्ध करून द्यावीत तसेच नाभिक समाज तथा सलून व्यावसायिकांना कोरोना काळात झालेल्या नुकसानभरपाईसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात नाभिक समाज अध्यक्ष प्रीती अनकर, उपाध्यक्ष गुरुदेव बारसागडे, पंकज येवले, धर्मेंद्र अतकरे, रत्नाकर शेंडे, राजू येवले यांचा समावेश होता.