तिरोडा : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे, ऑक्सिजन व औषधाेपचार व वेळेवर बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत २०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे उपचाराअभावी दगावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना शासनाने १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.
कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुध्दा तोकडी पडत आहे. जिल्ह्यात कोरोनावरील औषधांचा सुध्दा मागील दोन तीन दिवसांपासून तुटवडा आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची अजूनही भटकंती सुरु आहे. तर शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल असल्याने रुग्णांना वेळीच उपचार मिळणे कठीण झाले आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी पायपीट करतानाच रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वेळीच उपचाराअभावी रुग्ण मोठ्या प्रमाणात दगावत आहे. यामुळे कुटुंबीयांवर सुध्दा मोठे संकट ओढावत आहे. अशात कोविड हे नैसर्गिक संकट समजून उपचाराअभावी दगावलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी शासनाकडे केली आहे.