गोंदिया : जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत आतापासूनच पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ््यातच या प्रकल्पांत मोजका पाणी साठी शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने उन्हाळ््यात जिल्ह्यात पाणी पेटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता आॅक्सीजनवर असल्याने पाणी टंचाई रबी हंगामालाही परिणामकारक ठरणार असल्याचे चित्र आहे. पावसाने दगा दिल्याने शेतीपासून सिंचनापर्यंत सर्वच गणित चुकल्याचे उत्तर आता पुढे येत आहे. पावसाच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही भागलेली नाही. हेच कारण आहे की, ऐन हिवाळ््यात जिल्ह्यातील प्रकल्पांत आतापासूनच पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख प्रकल्पांची स्थिती बघता यंदाचा उन्हाळा कसा जाणार हा विचार न करणेच बरे वाटते. कारण ३१८.८५ दलघमी क्षमता असलेल्या इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ६१.५२ दलघमी (१९.२९ टक्के) एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. १५९.७८ दलघमी क्षमता असलेल्या सिरपूर प्रकल्पात ६७.९९ दलघमी (४२.५६ टक्के), ४३.५३ दलघमी क्षमता असलेल्या पूजारीटोला प्रकल्पात २०.९१ दलघमी (४८.०४ टक्के) तर २७.७२ दलघमी क्षमता असलेल्या कालीसरार प्रकल्पात ०.३२ दलघमी म्हणजेच १.१६ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. या प्रमुख प्रकल्पांची ही स्थिती असताना अन्य जिल्ह्यातील १० मध्यम व २० लघु प्रकल्पांचीही स्थिती यापासून काही वेगळी नाही. मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, रेंगेपार, संग्रामपूरव उमरझरी प्रकल्पांत ५० टक्केच्या आत पाणी साठा शिल्लक असून फक्त मानागड, कटंगी व कलपाथरी प्रकल्पांत ५० टक्केच्यावर पाणी साठा आहे. शिवाय लघु प्रकल्पांतील एकाही प्रकल्पात ५० टक्के च्यावर पाणी साठा शिल्लक नसल्याचे चित्र आहे. हा सर्व प्रकार बघता येणारा काळ कठीणच असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे. अशात शेतकरी मात्र पुन्हा संकटात अडकला असून त्याला रबीची चिंता लागली आहे. (शहर प्रतिनिधी)प्रश्न रबीच्या सिंचनाचा ४प्रकल्पांतील पाण्याची ही स्थिती लक्षात घेता आता यातून रबी हंगामासाठी सिंचन कसे करता येईल अशा प्रश्न येथे पडतो. पावसामुळे खरिपाचा हंगाम शेतकरी गमावून बसले आहेत. रबी हंगामापासून शेतकरी आशा लावून बसला होता. मात्र प्रकल्पांतही पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी आणावे कोठून अशा पेचात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे रबीच्या सिंचनावर आता शासनाकडून काय पाऊल उचलले जाते यावरच रबीचा हंगाम निर्भर आहे. सर्वच मामा तलाव आटले ४एकेकाळी शेतीला हातभार लावणारे मामा तलाव आतामात्र शेतीसाठी काहीच करू शकत नसल्याचे दिसत आहे. कारण ३८ तलावांची नोंद असलेल्या पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीनुसार एकाही मामा तलावात पाणी साठा नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार फक्त मालीदुंगा तलावात १.००३ टक्के पाणी साठा असल्याची नोंद आहे. तर अन्य ३७ तलावांत शून्य टक्के पाणी साठा दशर्विला जात आहे.लघु प्रकल्पांनाही लागली घरघर ४जिल्ह्यात २० लघु प्रकल्प असून यातील बहुतांश प्रकल्प आतापासूनच रिते झाल्याची नोंद आहे. यातील आक्टीटोला व हरी प्रकल्प आटल्याची नोंद झाली असून डोंगरगाव, गुमडोह, पांगडी, रेहाडी, रिसाला, सोनेगाव, सालेगाव, सडेपार, सेरपार, वडेगाव या प्रकल्पांत १० टक्केच्या आत पाणी साठा आहे. उर्वरीत प्रकल्पांचीही स्थिती अशीच असून ४६ टक्केच्यावर एकाही प्रकल्पात पाणी साठा असल्याची नोंद नाही. तर मध्यम प्रकल्पातील खैरबंधा प्रकल्पातही ७.३३ टक्के पाणी साठा असल्याची नोंद आहे.
जिल्ह्यातील प्रकल्प आॅक्सिजनवर
By admin | Updated: January 25, 2016 03:16 IST