नवेगावबांध : बहुप्रतीक्षित झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाचे प्रलंबित असलेले काम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आ.राजकुमार बडोले यांनी उपसा सिंचन विभाग, यांत्रिकी विभाग, जलविद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची सभा घेतली. सदर सभेत डिसेंबर १४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही संबंधित अभियंत्यानी दिली. झाशीनगर उपसा सिंचन या महत्वाकांक्षी प्रकल्पाला युती शासनाच्या काळात मंजुरी प्रदान करण्यात आलेली होती. यामध्ये इटियाडोह धरणाचे पाणी हे उपसा सिंचन पध्दतीने नवेगावबांध जलाशयात आणून नवेगावबांध परिसरातील सुमारे १५०० हेक्टर जमीनीचे सिंचन होणार आहे. परंतु शासन व प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे सर प्रकल्पाचे काम मात्र अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे मुख्यत्वाने याचा फटका मात्र परिसरातील शेतकर्यांना बसत आहे. झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण होणे सर्वाच्याच हिताचे असल्याकारणाने दि. ८ मे रोजी आ. बडोले यांनी नवेगावबांध येथे एक संयुक्त आढावा बैठक घेतली. बैठकीला उपसा सिंचन व विदर्भ मध्यम प्रकल्प विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम, यांत्रिकी विभाग भंडाराचे कार्यकारी अभियंता शिंदे, जलविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता भोरे, वनपरिक्षेत्राधिकारी मेहेर, उपसा सिंचन उपविभाग अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय अभियंता चौधरी माजी आ.दयाराम कापगते, जि.प. सदस्य मधुकर मरस्कोल्हे, रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य महादेव बोरकर व सबंधीत विभागाचे बहुसंख्य अधिकारी उपस्थित होते. सदर प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे थोडेसे काम बाकी आहे, तसेच भूमी अधिग्रहणाचे काहींचे पैसे देने बाकी आहे. यासाठी आदिवासी विकास उपयोजनेतून निधीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विद्युत पुरवड्याच्या मुख्य कामासाठी ३.२० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. नवेगावबांधपासून तर प्रकल्पापर्यंत विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासाठी ४.१.२०१२ ला सबंधीत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. एक्सप्रेस फिडरकरीता रेल्वे क्रॉसींग संबधाने प्रस्ताव जलविद्युत विभागाने रेल्वे विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात यावा असेही ठरविण्यात आले. प्रकल्पाकरिता नियंत्रण कक्ष, पंप, पाईप जोडणे, डिलीव्हरी चेंबर, व्हाल्व, जेन्ट्री आदी कामाकरीता ३.९४ करोड रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सदर प्रकल्पाला लागणारी यंत्र सामग्री काही प्रमाणात पाच वर्षापूर्वीच आणण्यात आलेली आहे. सदर प्रकल्पाचे काम फ्लोअर लेव्हलपर्यंत पूर्ण झालेले असून उर्वरीत काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. डिसेंबर १४ पर्यंत सदर प्रकल्पा पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट असल्याची ग्वाही सबंधीत अभियंत्यानी सदर बैठकीमध्ये दिली. त्यामुळे भविष्यात नवेगावबांध परिसरातील सुमारे १५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे मुख्यत्वाने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल व दुबार फसलीने बळीराजा देखील सुखावणार आहे. बैठकीनंतर आ. बडोले व सबंधित अधिकार्यांनी कार्यस्थळी जाणून कामाचा आढावा देखील घेतला. (वार्ताहर)
झाशीनगर उपसा सिंचनाच्या प्रलंबित कामाला येणार गती
By admin | Updated: May 10, 2014 00:19 IST