सालेकसा : उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयात नेटसेट प्राध्यापकांना पदोन्नती द्यावी, त्यांना कुंठीत वेतनवाढ द्यावी, असे निर्णय दिलेले आहेत. मात्र राज्य शासनाच्या कुंभकर्णी झोपेमुळे न्यायालयाच्या निर्णयाची अवमानना होत असून प्राध्यापकावर हेतुपुरस्पर राज्य सरकार अन्याय करीत असल्याची भावना महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची झाली आहे. त्यामुळे प्राध्यापक महासंघ पुन्हा राज्य शासनाच्या विरूद्ध आंदोलन करणार आहे.या अगोदर महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन, असहकार आंदोलन, धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. पण सरकारने लक्ष दिले नाही. तेव्हा पुन्हा महाराष्ट्रात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. २४ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत विद्यापीठस्तरीय संघटनेमार्फत कुलगुरूंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी १ डिसेंबर २०१४ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. सोमवारी ८ डिसेंबर २०१४ रोजी राज्यभर सामूहिक रजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी १५ डिसेंबर २०१४ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन एमफुक्टो अध्यक्ष ए.टी. सानप, डॉ. प्रविण रघुवंशी, नुटा सचिव डॉ. अनिल ढगे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष डॉ. अश्विन चंदेल, उपाध्यक्ष डॉ.एन.एम. हटवार, सचिव डॉ. दिलीप जेना, डॉ. ए.एम. गहाणे, प्रा.बी.बी. परशुरामकर, विजय राणे, प्रा.व्ही.टी. गजभिये, डॉ. छाया पटले, प्रा.बी.टी. फुंडे, प्रा. डॉ. नंदेश्वर व इतर प्राध्यापकांनी केलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्राध्यापक महासंघ पुन्हा करणार आंदोलन
By admin | Updated: October 15, 2014 23:20 IST