वडेगाव : गाढ निद्रेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आपली जबाबदारी पार पाडण्यात कमकुवत ठरला. अखेर त्या षष्टींनी (व्यक्तींनी) रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे श्रमदानातून भरले. त्यांच्या या कृत्याची परिसरात प्रशंसा केली जात असून बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीला घेऊन मात्र रोष व्यक्त केला जात आहे. वडेगाव- बिर्सी या चार किमी. लाबीच्या रस्त्यावर सतोना व बोपेसर ही दोन गावे आहेत. त्यात सतोना वळणावरील छोटा नाला व बोपेसर जवळील नाल या दोन्ही पुलांवरील रस्ता खचल्यामुळे दोन्ही ठिकाणी मधोमध दोन मोठे खड्डे पडले होते. हे खड्डे सहज लक्षात येत नसल्यामुळे दुचाकींचे कित्येक अपघात येथे घडले असून सुमारे १९ जण जखमी झाले आहेत. चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकारासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु निद्रीस्त बांधकाम विभागाला याची गंभीरता कळलीच नाही. याचे गांभीर्य मात्र या रस्त्याने दररोज सकाळी फिरायला जाणाऱ्या सहा व्यक्तींना कळले. यावर त्यांनी बांधकाम विभागाची वाट न बघता श्रमदानातून दोन्ही खड्डे भरून काढले. विशेष म्हणजे श्रमदान करणाऱ्या या सहा व्यक्तींमध्ये बिडी कंपनीचे व्यवस्थापक पृथ्वीराज ठाकरे, कंत्राटदार निलकंठ बिसेन, सेवानिवृत्त शिक्षक रामदास ढोक, सेवानिवृत्त कर्मचारी धोंडू बिसेन, व्यवसायी संजय असाटी व बिमा अभिकर्ता दिलीप बिसेन यांचा समावेश असून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे. येथे विशेष म्हणजे, वडेगाव-लाखेगाव क्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनेक पदाधिकारी या मार्गाने सतत प्रवास करीत असतात. पंचायत समिती सदस्य तेजराम चव्हाण हे अपघातांचे मुक्तभोगी आहेत. जिल्हा परिषद सदस्य विष्णूपंत बिंझाडे, माजी उपसभापती थानसिंग बघेले तसेच या खड्यांच्या अगदी जवळचे निवासी पंचायत समिती सदस्य शंकर बिंझाडे हे सर्वच बघ्याची भूमिका पार पाडीत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (वार्ताहर)
‘त्या’ षष्टींनी बुजविले रस्त्यांवरील खड्डे
By admin | Updated: April 26, 2015 01:17 IST