पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : सदस्य व पदाधिकाऱ्यांचे मौन, शहरवासीयांचा जीव मात्र धोक्यात गोंदिया : शहरातील बहुतांश रस्त्यांच्या मधोमध खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी भरून ते दिसेनासे होत असल्याने हेच खड्डे आता अपघातांचे जनक बनत आहेत. या प्रकाराकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तर पदाधिकारीही आपली जबाबदारी झटकून मोकळे झाल्याचे बघावयास मिळत आहे. या प्रकारामुळे शहरवासीयांचा जीव मात्र धोक्यात असून त्यांत रोष खदखदत आहे. या खड्ड्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची गरज आहे, अन्यथा शहरवासीयांच्या जीवावर बेतणार यात शंका नाही. शहरातील रस्त्यांबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. बहुतांश रस्ते उखडल्याने गोंदिया शहराची गत एखाद्या खेड्यापेक्षाही बत्तर झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात वाहन चालविणे कठिण झाले आहे. त्याता आता मात्र रस्त्यांवरील उघड्या खड्ड्यांमुळे लोकांच्या जीविताला धोकाही दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, रस्त्यांच्या खालून गेलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी खड्डे (आऊटलेट) रस्त्यांच्या मधोमध किंवा कडेला सोडण्यात आले आहे. या खड्ड्यांची सफाई करून त्यावर झाकण टाकून हे खड्डे बंद ठेवण्याची गरज आहे. येथे मात्र चित्र उलटेच आहे. बहुतांश खड्ड्यांवर झाकणच नाही, तर काही खड्ड्यांचे झाकण त्यांच्या शेजारी ठेवले असल्याचे चित्र आहे. बाजार भागात असलेल्या गुजराती समाजवाडी समोरून भाजी बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असा खड्डा (आऊटलेट) ठेवण्यात आला आहे. मात्र त्याला झाकण लावण्यात आलेले नाही. असाच खड्डा इसरका मार्केट समोर, शारदा वाचनालय समोर असून असेच खड्डे शहरातील कित्येक ठिकाणांवर दिसून येतात. या खड्ड्यांवर झाकण लावण्याची गरज आहे. मात्र तेवढी तसदी घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वेळ नसून त्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. तर श्री टॉकीज शेजारील दिल्ली हॉटेल समोर रस्त्याच्या मधोमध नाली फुटून तेथे खड्डा पडला आहे. यासह अशाच कित्येक खड्ड्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. मात्र त्यांची आहे तीच स्थिती दिसून येत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यातही गोंदिया शहरातील पावसाळ्याची विशेषता अशी की, येथे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता रस्त्यावरच साचून राहते. अशात मात्र हे रस्ते पाण्याखाली जात असून रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना रस्त्यावरील हे खड्डे दिसत नाही. अशात लहान-सहान अपघात तर या खड्ड्यांमुळे घडतच आहेत. मात्र एखादा मोठा अपघात घडून त्यात कुणाच्या जीवावर बेतण्याची वाट शहराचे नगर पालिका प्रशासन बघत आहे काय असा सवाल मात्र शहरवासीयांकडून केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
अपघातांचे जनक ठरताहेत रस्त्यांवरचे खड्डे
By admin | Updated: June 24, 2015 01:57 IST