तिरोडा : आपसी बदल्या व्यतिरीक्त जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या स्थगित करण्यात याव्या, असा आदेश कक्षाधिकारी संजय कुडवे यांनी काढला आहे.प्राप्त माहितीनुसार, शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई अॅक्टमधील तरतुदीनुसार शिक्षकांच्या पद निश्चितीबाबत कार्यवाही पूर्ण होत नाही व न्यायालयाकडून जैसे थे परिस्थितीबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत आपसी बदली व्यतिरीक्त इतर कोणत्याही प्रशासकीय विनंती बदल्या, आंतरजिल्हा बदल्या करण्यात येऊ नयेत. १८ मे २०१५ पूर्वी ज्या जि.प. अंतर्गत शिक्षकांच्या आपसी बदल्या व्यतिरीक्त जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा बदल्या झाल्या असल्यास सदर बदल्या स्थगित करण्यात याव्यात, असा आदेश कक्ष अधिकारी कुडवे यांनी काढला. सदर आदेश (जिपब ४८१५/ (प्र.क्र.१२२/२०१५)/आस्था १४ ग्राम विकास व जलसंधारण विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट मुंबई-४००००१ दि. १८ मे २०१५) नुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांना पत्र पाठवून कळविण्यात आले आहे. त्यात नमूद केले आहे की, मुख्याध्यापकांची जिल्हानिहाय मंजूर पदांची संख्या कमी होत असल्याने काही जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी याचिका दाखल केल्या होत्या. १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयास ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याबाबत निर्णय दिलेला आहे. परिणामी २०१४-१५ संच मान्यता पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, मुख्याध्यापक पदोन्नती, पदावनती, पदविधर शिक्षक पदोन्नती इत्यादी प्रक्रिया होऊ शकल्या नाही. त्यामुळे सद्यस्थितीत आपसी बदल्या वगळता इतर बदल्या करणे अडचणीचे होत असल्याने स्थगित करण्यात आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
शिक्षक संवर्गाच्या बदल्या स्थगित
By admin | Updated: May 20, 2015 01:36 IST