धान पीक धोक्यात : शेतकरी संकटातआमगाव (दिघोरी) : जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत येत असलेल्या मालीपार येथील तलावाची डव्वा येथील आस्वली तलावाची व पाटबंधारे विभागामार्फ त असलेल्या टेकेपार डोडमाझरी येथील राजडोह तलावाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. जि.प. अंतर्गत असलेल्या तलावाची व नहराची डागडुजी मागील अनेक वर्षांपासून झाली नसल्याने नहराची नासधूस झाली आहे. पर्यायाने तलावाचा पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही. एकेकाळी या तलावामुळे सर्वंच शेतीला पाणी पुरत होते मात्र आता नहराची देखभाल न केल्यामुळे नहरातील पाणी पुढे सरकत नाही. शेतकऱ्यांनी नहराची स्वत: दुरूस्ती करून शेतीला पाणी द्यावे, असे शेतकऱ्याला अधिकारी सांगतात. मालीपार तलावाचे पाणी चांदोरी येथील शेतकऱ्यांना मिळत होते; मात्र नहराची पूर्ण वाट लागल्याने पाणी येत नाही. डव्वा येथील तलावाचे नहर झुडपांनी बुजले असून या नहराने पाणी कसे करावे हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या तलावाचे पाणी २५० एकर शेतीला होत असते. पावसाने दडी मारल्याने धानपिके धोक्यात आले असून पिकांसाठी पाण्याची नितांत गरज आहे. पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या टेकेपार, डोडमाझरी येथील तलावाच्या नहराचे काम एका खासगी कंत्राटामार्फत करण्यात आले; मात्र ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ज्या ठिकाणी नहराचे काम करण्यात आले त्या ठिकाणाहून पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे टेकेपारकडे नहराला पाणी येत नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला व पाणी वाटप अध्यक्षाला जाब विचारला मात्र कामाबाबत पाणीवाटप संस्थेच्या अध्यक्षाला कोणत्याच प्रकारची माहिती नाही. पक्का बांधकामाचे पैसे उचलले. मात्र कच्चे काम केल्याचा आरोप टेकेपार येथील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीचे धोरण शासन आखत आहे. मात्र अधिकारी बेजबाबदारपणे कार्य करीत असल्याने शेतकऱ्यांना अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)
मालीपार येथील तलावांची दुर्दशा
By admin | Updated: October 4, 2014 23:29 IST