राजेश मुनेश्वर - सडक/अर्जुनीवनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या वनक्षेत्र सहायक कोहमारा येथे एका हिरवेगार रोपवाटिकेत १ लाख ५८ हजार रोपांची जोपासना केली जात आहे. या रोपवाटिकेत सागवान, बांबू, अांजन, खैर, सीताफळ, करंजी, आवळा, बकान, आकाशनिम, शिवन, लिंब आदी रोपांची लागवड केली आहे. या रोपवाटिकेत कोहमारा येथील महिला व पुरूष मजुरांना रोजगार दिल्याची माहिती वनरक्षक रमेश काळबांधे यांनी दिली. उन्हाळ्याच्या दिवसात या रोपवाटिकेतील रोपांची निगा घेतली जात होती. त्या रोपांना उन्हाचा त्रास होवू नये याकरीता ग्रीन नेट लावून उन्हाचे तड्याख्यापासून बचाव करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्र सहाय्यक वसंत नाकाडे यांनी दिली. सडक/अर्जुनी तालुक्यात जागा मिळेल तिथे रोपवन लावून सडक/अर्जुनी तालुका हा हिरवागार करण्याची संकल्पना वनपरिक्षेत्र दिलीप वडेट्टीवार यांनी मांडली आहे. या तालुक्यात ओसाड असलेल्या जागेवर रोपाची लागवड जुलै महिन्यात करण्यात येणार असून ही रोपवन जगविण्याकरिता गाव परिसरातील लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत कोहमारा येथील रोपवाटिकेत वाटर पंपच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे. लहान रोपांना पाणी देण्यासाठी स्प्रेंकलर झाराचा उपयोग करून सिंचनाची सोय होत आहे. रोपांच वाढीसाठी खत व किड लागू नये यासाठी किटकनाशके व झाडांच्या वाढीसाठी वृक्षवर्धक घटकांची फवारणी वेळोवेळी केली जात आहे. सडक/अर्जुनी तालुक्यात हेटी, डव्वा, बकी, चिरचाडी,गोपाळटोली, मनेरी, पिंडकेपार, कनेरी, बोपाबोडी या गावातील रोपवनात अंदाजे १३० हेक्टर क्षेत्रात रोपाची लागवड करण्यात येणार आहे. रोपवनाची खरी जोपासना करण्यासाठी वन विभाग, वनव्यवस्थापक समिती व गावकऱ्यांचे सहकाऱ्यातून गाव परिसर हिरवेगार करण्याचे स्वप्न सर्वांनी मनी बाळगले पाहिजे. ही संकल्पना सर्वांनी मनी बाळगली तर संपूर्ण सडक/अर्जुनी तालुका हिरवेगार झाल्याशिवाय राहणार नाही हे विशेष!
१३० हेक्टर क्षेत्रात होणार रोपांची लागवड
By admin | Updated: July 7, 2014 23:39 IST