बांध तलावावर भूमाफियांची वक्रदृष्टी : तलाव समिती लढण्यास सज्ज गोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांध तलावातील जागाच विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातून आता बांध तलावावरही भूमाफियांची वक्रदृष्टी दिसून येत असून या जागेचे एन.ए. (अकृषक) त्यांनी करून टाकले आहे. मात्र बांध तलावाला वाचविण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक डी.एस.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात बांध तलाव समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती बांध तलावाची जागा वाचविण्यासाठी आता संघर्ष करीत आहे. कुडवाच्या सीमेत येणारा मात्र सुर्याटोलाला लागून असलेला बांध तलाव लगतच्या विद्यानगर, केशवनगर, परमात्मा एक नगर, साई कॉलनी परिसरात दरवर्षी कहर करतो. यातूनच त्याची सिंचन क्षमता व क्षेत्राचा अंदाज लावता येतो. वास्तविक ढाकणी-खर्रा येथील जंगल व पहाडावरील पाणी वाहून या तलावात जमा होते व तलाव फुटल्यावर तलावाचे पाणी लगतच्या कॉलनीत शिरते. यावर तोडगा म्हणून शासनाकडून मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. नेमकी हीच बाब हेरून भूमाफियांचे बांध तलावाकडे लक्ष वळले असून आता त्यांनी तलावाचीच जागा विकून खाण्याचा धंदा सुरू केला आहे. विशेष म्हणजे या भूमाफियांनी तलावातील या जागेचे एनए करून टाकले आहे. तर आता त्या जागेवर कॉलनी वसविण्यासाठी प्लॉट्स पाडण्यात आले आहेत. येथे तलावाच्या जागेला एन.ए. कसे काय करण्यात आले हा मुख्य मुद्दा असून तलावाची जागा वाचविण्यासाठी बांध तलाव जिर्णोध्दार समितीचे गठन करण्यात आले आहे. तसेच सेवानिवृत्त शिक्षक सूर्यवंशी यांनीही यासाठी आंदोलन छेडले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून एन.ए. रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत मे महिन्यात उप विभागीय अधिकारी के.एन.के.राव यांनी तलावाचे निरीक्षण केले. मात्र त्यानंतरही जागेचे एन.ए. रद्द करण्यात आलेले नाही. प्राप्त माहितीनुसार, सुमारे १५० एकर जागेत बांध तलाव पसरले आहे. यातील सुमारे १०० एकर जागा खाजगी शेतीची असून काही शासनाचीही यात जागा आहे. तलावात पाणी राहत नाही त्यावेळी मालक त्या जागेवर शेती करू शकतो, मात्र पाणी राहिल्यास मालक त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. यामुळे काही जणांनी आपली जागा विकून टाकली आहे. ही जागा खरेदी करणाऱ्यांकडून या जागेवर कॉलनी तयार करण्याची योजना होती. मात्र बांध तलाव जिर्णोद्धार समितीने आडकाठी आणल्याने त्यांच्या कामात अडचण निर्माण झाली आहे. तर समिती आता जागेचे एन.ए.रद्द करण्यासाठी संघर्ष करीत आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचेही ध्यानाकर्षण करण्यात आल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)तलावात बोटींगची योजना या तलावाच्या सौंदर्यीक रणासाठी पूर्वी ५९ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. यातून तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तसेच अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. पाळ उंच व रूंद करण्यात आली. या पाळीचा उपयोग आता आवागमनासाठी होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तलावाच्या सौंदर्यीकरणाकडे जातीने लक्ष दिले व यासाठी त्यांनी ८९ लाख रूपयांचा निधी नावीन्यपूर्ण योजनेत मंजूर केला होता. यात तलावाच्या पाळीवर टाईल्स लावणे, तलावाच्या दोन्ही बाजूंना १५० मीटर पर्यंत दगडांचे पिचींग यासोबतच तीन फूट उंच सुरक्षाभिंत मंजूर करण्यात आली आहे. या जागेवर पायऱ्या तयार करण्यात येणार आहेत. यासाठी ७५ लाख रूपये मंजूर असून वर्क आॅर्डरची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते. ही सर्व कामे झाल्यावर नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने तलावात बोटींग सुरू करण्याची योजना आखली जात आहे.
तलावाची जागाच विकून टाकली
By admin | Updated: September 5, 2015 02:20 IST