आमगाव : गणेश विसर्जन झाल्यानंतर लागलीच पितृपक्षाला सुरुवात होते. पितृपक्षामध्ये विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढते. यंदा पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर कधी ऊन, तर अचानक पाऊस वाढल्याने भाजीपाला खराब होऊ लागला होता. त्यामुळे बाजारात भाजीपाला आवक कमी झाली असून, मागणीही वाढल्याने दरात तेजी आली आहे.
गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यामुळे भाजीपाला बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढल्यामुळे दरात वाढ झाली आहे. महाप्रसादाला आणि पितृपक्षात वांगी जास्त विकली जातात; परंतु बाजारात हिरवी वांगी मिळत नसून छत्तीसगडमधून येणारी वांगी ४० ते ५० रुपये किलोने विक्री केली जात आहेत. देशी कारल्याचे भाव स्थिर असून, ४० रुपये किलो दराने विकत मिळत आहेत. मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सप्टेंबर महिन्यात भाजीपाल्याचा पुरवठा कमी होत असल्याने दर वाढत असल्याचे येथील भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.
........
मागणी वाढल्याने दरात तेजी
सध्या पितृपक्ष सुरू झाल्याने भाजीपाल्याला मागणी वाढली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात तेजी आहे. आता हवामान विभागाने पुन्हा तीन दिवस पाऊस सांगितला आहे. त्यामुळे दरात तेजी होण्याची शक्यता आहे.
- भाजीपाला विक्रेते
.................
आमगाव शहरात विविध ठिकाणी भाजी बाजारात
वांगी ४० ते ५० रुपये किलो
टोमॅटो २० रुपये किलो
बटाटे २० रुपये किलो
काकडी ३५ रुपये किलो
कोथिंबीर २०० रुपये किलो
भोपळा ३० रुपये किलो
भेंडी ४० रुपये किलो
गवार ४० रुपये किलो
दोडके ३० रुपये किलो
दुधी भोपळा २० रुपये किलो