गोंदिया : आता सामान्य लोकांच्या आशा अधिक वाढल्या आहेत. महाराष्ट्रात जादू-टोणा विरोधी कायदा लागू झाला आहे. धर्म व भगवान प्रत्येक व्यक्तीसाठी श्रद्धेचा विषय आहे. व्यक्ती स्वत: श्रद्धाळू असतो, परंतु श्रद्धा केव्हा अंधश्रद्धेत परिवर्तित होते, कळतच नाही. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्म व कर्म या दोन्ही बाबींना पारखावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्रा.श्याम मानव यांनी केले.गुरूवारी (दि.२०) रात्री कन्हारटोली येथील पवार सांस्कृतिक भवनात लोकांनी भरलेल्या भरगच्च सभागृहात ते व्याख्यान देत होते. सदर समारंभ सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग, समाजकलयण आयुक्तालय, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे होते. अतिथी म्हणून नागपूरवरून आलेले अंनिसचे सुरेश झुरमुडे, ग्राहक आंदोलनाचे अजीतकुमार जैन, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, अंनिसचे जिल्हा संघटक प्रा.प्रकाश धोटे, अमर वऱ्हाडे उपस्थित होते.याप्रसंगी प्रा.मानव यांनी जादूटोना विरोधी कायद्याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हा कायदा देव-धर्मांच्या विरूद्ध नाही. कोणत्याही व्यक्तीच्या श्रद्धेवर आळा घालत नाही. परंतु अंधश्रद्धा पसरविणारे या कायद्यान्वये शिक्षेस पात्र आहेत. त्यांनी आपल्या व्याख्यानात अनेकदा विविध संतांचा उल्लेख करताना सांगितले की, संतांच्या विचारांच्या आधारावरच सदर जादूटोना विरोधी कायदा बनविण्यात आला आहे. त्यांनी सदर कायदा पारित करविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती देताना सांगितले की, आता सामान्य व्यक्तीलासुद्धा आपली सजगता दाखवावी लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोनासह चिकित्सक प्रवृत्तीने समोर यावे लागेल. आता मानवतेच्या उद्धारासाठी माणसाला पुढे पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन अमर वऱ्हाडे यांनी, प्रास्ताविक सुरेश झुरमुडे यांनी तर आभार सुरेश पेंदाम यांनी मानले. (प्रतिनिधी)
वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्म-कर्म पारखावे
By admin | Updated: November 22, 2014 00:40 IST