गोंदिया : घरगुती कारणावरून भल्या पहाटे जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या एका वृद्धाला छोटा गोंदियातील जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचविता आले. त्याचे असे झाले की, छोटा गोंदियातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामागील तलावात अंदाजे ६५ ते ७० वर्षे वयाचा एक संजय नगरमधील वृद्ध जलसमाधी घेण्यासाठी आला. पहाटे ४.३० वाजता त्या परिसरात राहणारे अशोक बिसेन हे लघुशंकेसाठी घराबाहेर आले असताना त्यांना मंदिराच्या पायरीवर कपडे आणि खाली चप्पल दिसली. त्यामुळे पुढे येऊन पाहीले तर तलावात एक व्यक्ती आपले डोके बुडवत असल्याचे दिसून आले. त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता ती व्यक्ती आणखी पाण्यात जात होती. त्यांनी धावत चौकात येऊन काही लोकांना गोळा केले. यानंतर विजय बिलोने, सुनील साखरपुडे, सुनील बिसेन, भौजु भगत, विनोद बर्वे, टिल्लू रहांगडाले, राजकुमार मोरे यांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी अंधारातच विनोद बर्वे याने पाण्यात जाऊन त्या पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर ओढले. त्यांच्या नाकातोंडात गेलेले पाणी काढले. त्यानंतर चौकशी केली पण तो वृद्ध काहीच सांगायला तयार नव्हता. नागरिकांनी पोलिसांना माहिती देण्यासाठी अनेक वेळा पोलीस कंट्रोल रूमचा १०० नंबर डायल केला. पण कोणीही फोन उचलला नाही. शेवटी संतोष बिलोने या युवकाने पत्ता शोधून नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
अन जलसमाधी घेणाऱ्या वृद्धाला लोकांनी वाचविले
By admin | Updated: February 25, 2017 00:20 IST