खासदार दत्तक आदर्श ग्राम : विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजनगोरेगाव : खा. प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेवून आदर्श ग्राम पाथरीला विकासाच्या शिखरावर नेण्याचे व राज्यातील अव्वल गाव बनविण्याचा संकल्प केला होता. गत वर्षापासून या गावाची जोमाने विकासाकडे वाटचाल सुरू आहे. खासदार दत्तक गावाला मिळणारा शासकीय विकास निधी, मनोहरभाई पटेल अकादमी व अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आलीत. पाथरी गावात विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन व वैयक्तीक गॅस वितरण कार्यक्रम पार पडले. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य ललिता चौरागडे होत्या. उद्घाटन, भूमिपूजन व वैयक्तिक साहित्यांचे वितरण आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून वनक्षेत्राधिकारी एस.एम. जाधव, पोलीस उपनिरीक्षक खडसे, विस्तार अधिकारी बेदरकर, नायब तहसीलदार नागपुरे, वनविभागाचे राऊंड आॅफीसर आर.एन. भगत, तंमुसचे अध्यक्ष रोशन कटरे, पोलीस पाटील सोमराज बघेले उपस्थित होते. प्रास्ताविक खासदार प्रतिनिधी तथा पं.स. सदस्य केवल बघेले यांनी मांडले. संचालन मानेश्वर जनबंधू यांनी केले. सुरुवातीला भूताईटोला पाथरी येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्वच्छता संदेश महारॅली काढण्यात आली. बुद्धविहारात अदानी फाऊंडेशनतर्फे तयार झालेल्या समाजमंदिराचे उद्घाटन करण्यात आले. श्रमदानातून मुख्य चौकात बनविण्यात आलेल्या बगिच्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गाव प्रवेशद्वाराचे लोकार्पण झाले. अदानी फाऊंडेशनतर्फे १६० लोकांना ८० हजार रुपयांचे चष्मे वितरित करण्यात आले. दोन समाज मंदिरांचे बांधकाम व गावातील चौकाचौकात आराम खुर्च्या बसविण्यात आल्या. ५ लाख रुपये खर्चाने तलाव खोलीकरण करण्यात आले. जि.प. शाळेला सात संगणक व एक बोअरवेल भेट देण्यात आली. तर ग्रामस्थांच्या मदतीने एक प्रोजेक्टर व जि.प.कडून एक प्रोजेक्टर देण्यात आले. याशिवाय मनोहरभाई पटेल अकादमीतर्फे आर्थिक कुमकुवत कुटुंबातील रुग्णांना यंत्रसामुग्री व औषधोपचार करण्यासाठी मदत देण्यात आली. यात तीन चाकी सायकल, कर्णयंत्र व चष्मे आदींचा समावेश आहे.
पाथरी ग्रामची जोमाने विकासाकडे वाटचाल
By admin | Updated: October 21, 2016 01:49 IST