देवानंद शहारे गोंदियाजिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हाभरातील विविध धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली. त्यात फेडरेशन व महामंडळ मिळून ३१ मार्च २०१५ पर्यंत खरीप हंगामात एकूण आठ लाख ४९ हजार ४७९ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मागील वर्षी याच काळात ६ लाख ३ हजार ३२७ क्विंटल धान खरेदी झाली होती. त्यामुळे यावर्षी तब्बल ४० टक्क्यांनी धान खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.सन २०१४-१५ च्या खरीप हंगामात मार्केटिंग फेडरेशनने ‘ए’ ग्रेडचा एकूण ७०२ क्विंटल तर सर्वसाधारण ग्रेडचा एकूण चार लाख ३२ हजार ९६२.१० क्विंटल धान खरेदी केला. दोन्ही ग्रेड मिळून फेडरेशनद्वारे यंदा एकूण चार लाख ३३ हजार ६६४ क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे. मागील वर्षी सन २०१३-१४ मध्ये ‘ए’ ग्रेडचा २१३३.२० क्विंटल धान खरेदी करण्यात आला होता. तर सर्वसाधारण ग्रेडचा २ लाख ७८ हजार १८० क्विंटल धान खरेदी करण्यात आला होते. दोन्ही ग्रेड मिळून मागील वर्षी (२०१३-१४) मध्ये मार्केटिंग फेडरेशनने एकूण दोन लाख ८० हजार ३१३.२ क्विंटल धान खरेदी केला होता. त्यात ‘ए’ ग्रेडचा धान २१३३ क्विंटल होता. त्याही पूर्वी सन २०१२-१३ मध्ये फेडरेशनने ‘ए’ ग्रेडचा एकूण ५ हजार १७८ क्विंटल धान खरेदी केल्याचे फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी ‘ए’ ग्रेडच्या धानात बरीच घट आली आहे.आदिवासी महामंडळाने सन २०१४-१५ मध्ये खरीप हंगामाचे देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या चार तालुक्यातील आपल्या एकूण ४० धान खरेदी केंद्रातून एकूण चार लाख १५ हजार ८१५ क्विंटल धान खरेदी केला आहे. मागील वर्षी केवळ तीन लाख २३ हजार ०१४.३२ क्विंटल धान खरेदी केला होता. आदिवासी विकास महामंडळाने गतवर्षीच्या तुलनेत यंदा ९२ हजार ८००.७३ क्विंटल अधिक धान खरेदी केले आहे.उत्पन्न वाढले की, खरेदीचा घोळ?गेल्यावर्षी (२०१३-१४) या आर्थिक वर्षात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळानेही गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या धानापेक्षा कमी प्रमाणात धान खरेदी केले होते. यावर्षी ४० टक्क्यांनी खरेदी वाढण्यामागील कारण केवळ उत्पन्नात वाढ झाली असे नाही. मागील वर्षी छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यांनी आधीच धानाला बोनस जाहीर केला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांमार्फत आधीच शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला बराच धान तिकडे विक्रीसाठी गेला होता. राज्य सरकारने काही कालावधी लोटल्यानंतर बोनस जाहीर केला. त्यामुळे आधीच छत्तीसगड, मध्यप्रदेशात गेलेल्या धानामुळे जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर आवक कमी झाली. यावर्षी कोणत्याच राज्यात बोनस नसल्यामुळे सर्व धान स्थानिक खरेदी केंद्रांवरच विकल्या गेला. त्यामुळे आवक आवडल्याचे दिसून येत आहे.रबीसाठी खरेदी केंद्रांची प्रतीक्षाउन्हाळी धानपीक आता कापणीवर आले आहे. मात्र त्यासाठी कुठे-कुठे खरेदी केंद्र उघडायचे याबाबत अद्यात नियोजन करण्यात आले नाही. खरीप हंगामातील धान खरेदी मार्केटिंग फेडरेशनने एकूण ४६ धान खरेदी केंद्रांमार्फत केली होती. उन्हाळी धानकापणीला अजून सुरूवात झाली नाही, या धानाचे क्षेत्र पाहून व शेतकऱ्यांची मागणी बघून उन्हाळी धान खरेदीसाठी केंद्र ठरविण्यात येतील, असे मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच आदिवासी विकास महामंडळाने मागील वर्षी उन्हाळी धान ३० हजार ८१३ क्विंटल खरेदी केले होते. मात्र यंदा उन्हाळी धानपिकाच्या खरेदीसाठी कसलेही आदेश अद्याप न आल्याने जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांचे नियोजन होणे बाकी आहे. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी धानपीक खरेदीसाठी केंद्र कमी असतात, मात्र खरीप हंगामाचेच केंद्र उन्हाळी धानपीक खरेदीसाठी उपयोगात आणले जातात, असे आदिवासी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
धान खरेदी ४० टक्क्यांनी वाढली
By admin | Updated: April 30, 2015 00:59 IST