गोंदिया : ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावू नये, रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल हे सातत्याने प्रयत्नरत आहे. मागील दोन दिवसांत त्यांनी दोन्ही जिल्ह्यांना लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. त्यानंतर शनिवारी पुन्हा दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० हजार मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. हे ऑक्सिजन घेऊन दोन्ही टँकर आज जिल्ह्यात दाखल झाले आहे. यामुळे ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र त्यातुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने दोन्ही जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, तर रुग्णांचे जीव सुद्धा धोक्यात आले होते. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. तसेच दोन्ही जिल्ह्यांसाठी नियमित ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यास सांगितलेे होते. त्यानंतर चार पाच दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० हजार मेट्रिक टनचे दोन ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि.२४) भिलाई येथून प्रत्येकी १० हजार मेट्रिक टन लिक्वड ऑक़्सिजन घेऊन दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी एक टँकर दाखल झाले. त्यामुळे ऑक्सिजन टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांत निर्माण झालेल्या कोविड परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे लक्ष असून ते दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. माजी आ. राजेंद्र जैन हेसुद्धा दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थितीसंदर्भातील माहिती खा. पटेल यांना देत आहेत.
..........
मेडिकलमधील ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धपातळीवर
अदानी वीज प्रकल्पाचा सीएसआर निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३५०० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजन टँक दाखल झाले असून लवकरच हा प्लांटसुद्धा कार्यान्वित होणार आहे. यामुळे ऑक्सिजनची समस्या पूर्णपणे मार्गी लागणार आहे. याचासुद्धा आढावा सातत्याने खा. प्रफुल्ल पटेल घेत आहेत.