सालेकसा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी काम करण्यासाठी पार्वती शिक्षण विकास संस्था गोरेगावकडून सालेकसा येथील पंचायत समितीत कंत्राटी पॅनल तांत्रिक अधिकारी या पदाकरिता नावे मागविण्यात आली होती. सादर केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता विषयक तपासणी केली असता निकषाप्रमाणे पात्र ठरत असल्याने त्यानुसार सदर कंत्राटी पॅनेल तांत्रिक अधिकारी यांचे यादीत जिल्हाधिकाऱ्यांकडून ६ सप्टेंबर २०१४ च्या कार्यवृत्रानुसार मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानुसार यादीत समाविष्ट असलेल्यांना आदेश निर्गमित करण्याबाबद निर्देश देण्यात आले होते. परंतु संस्थेकडून कंत्राटी पॅनल अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित करून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात यादी सादर करण्यात आली. पण यादीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केलेल्या यादीतील उमेदवारास आदेश न देता त्या ऐवजी शिवकुमार श्रीराम रहांगडाले यांची नियुक्ती संस्थेने केली. रहांगडाले यांनी अॅग्रीकल्चर ड्राप्समन हा आयटीआयचा व्दिवर्षीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. सदर अभ्यासक्रम शासकीय परिपत्रकाप्रमाणे पूर्तता पूर्ण करीत नाही, तरीसुध्दा शिवकुमार रहांगडाले यांच्या नावाने कनिष्ठ अभियंता या पदासाठी आदेश देण्यात आले. शिवकुमार श्रीराम रहांगडाले यांनी पंचायत समिती अर्जुनी/मोरगाव येथे २१ एप्रिल २०११ ते ३० जून २०१३ या कालावधीत म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र पं.स. अर्जुनी/मोरगावचे खंडविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे सादर केलेले आहे. परंतु रहांगडाले यांनी मग्रारोहयो अंतर्गत जिजोबा शिक्षण संस्था, गोंदियामार्फत कनिष्ठ अभियंता या पदावर पंचायत समिती अर्जुनी/मोरगाव येथे २० एप्रिल २०१२ ते ३१ जुलै २०१२ व ०१ आॅक्टोबर २०१२ ते ३० जून २०१३ या कालावधीत फक्त काम केलेले आहे, असे प्रमाणपत्रावरून आढळून आलेले आहे. त्यामुळे रहांगडाले यांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्रसुध्दा चुकीचे आहे, असे आढळून आलेले आहे. संस्थेने शासन परिपत्रकातील शैक्षणिक अहर्तेनुसार नियुक्ती न करता शिवकुमार श्रीराम रहांगडाले यांना अवैधरीत्या आदेश दिलेले आहेत. निकषानुसार शिवकुमार रहांगडाले हे अपात्र ठरत असून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान केलेल्या उमेदवाराला कनिष्ठ अभियंता या पदावर नियुक्ती आदेश देण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पार्वती बहुउदेशीय विकास संस्था गोरेगावला दिलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)
संस्थेने केली जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल
By admin | Updated: September 29, 2014 00:47 IST