सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यातील बोथली या गावी बांधण्यात आलेला भूमिगत बंधारा अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाले असे दाखवून सदर बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी असा ठराव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतला. पाटबंधारे स्थानिक स्तर देवरी विभागांतर्गत मौजा बोथली येथे चुलबंध उमरझरी नाल्यावर स्मशानभूमीजवळ भूमिगत बंधाऱ्याचे काम मंजूर झाले होते. या कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. लाखो रुपये खर्च करून बांधलेला बंधारा एकदम निकृष्ट दर्जाचा असून बाजूला ओबडधोबड काम दाखवून भिंतीही बरोबर घेतलेल्या नाहीत. त्यामुळे सदर बंधाऱ्यात पाणी अडल्या जाणार का, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. बंधाऱ्याला एकच लहान दरवाजा ठेवला आहे. त्याला प्लेटसुध्दा लावण्यात आल्या नाही. त्यामुळे असे अपूर्ण काम कंत्राटदाराने करूनसुध्दा या कामाचे पाटंबधारे विभागाने लोकार्पण कसे केले? असाही प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सर्व गावकरी आणि ग्रा.पं.चे पदाधिकारी यांनी सदर बंधाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार केली आहे. सदर तक्रारीच्या प्रती उपविभागीय अभियंता, कार्यकर्ता अभियंता स्थानिक स्तर गोंदिया, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी तक्रारीच्या प्रती पाठवून चौकशी करण्याची मागणी केली आहे. बंधारे चांगले असावे, पाणी अडायला पाहिजे असे गावकऱ्यांचे मत आहे. (तालुका प्रतिनिधी)
अपूर्ण बंधाऱ्याचे लोकार्पण
By admin | Updated: March 1, 2015 01:01 IST