परसवाडा : गोंदिया तालुक्यातील पोलाटोला येथील शासकीय धान्य दुकानदार पुष्पा प्रीतलाल पटले यांनी गोदामातून धान्य गावी न आणता सरळ दलालामार्फत बाजारात काटी येथील दुकानदाराला विक्री केले. तसेच धान्य आलेच नाही, असे सांगून गावातील गरीब नागरिकांची दिशाभूल करून दोन महिन्यांपासून त्यांना वंचित ठेवून उपाशी राहण्यास बाद्य केले.देवटोला, बिजईटोला, पोलाटोला या तीन गावांसाठी एकच शासकीय स्वस्त दुकान आहे. या स्वस्त धान्य दुकानासाठी २८ क्विंटल तांदूळ व ५२ क्विंटल गहू असा एकूण ८० क्विंटल अन्न पुरवठा करण्यात आला होता. २ मे २०१५ रोजी गोंदिया अन्न पुरवठा गोदामातून मालाची उचल करण्यात आली होती. पण रेशन दुकानदाराच्या पत्नी माल पास झाले नसल्याचे सांगून बाजारात विक्री केले.गावकरी अभिमन पोतन पटले, गणपत कटरे, गुणीलाल कटरे, शिशुपाल पटले यांनी पुरवठा निरीक्षक आर.जे. ठाकरे यांना विचारले असता माल पास झाला असून उचलही केले व त्याला पंधरा दिवस लोटल्याचे सांगितले. धान्य विक्री केल्याची बाब गावकऱ्यांना माहिती होताच गरीब, उपाशी पोटी राहणारी जनता, मुले व महिला आक्रमक झाल्या. त्यांनी तहसीलदार व दवनीवाड्याचे पोलीस निरीक्षक यांना तक्रारही केली. पुरवठा निरीक्षक आर.जे. ठाकरे यांनी रेकॉर्ड बघितले असता माल वाटप झाले असल्याचे व खोट्या स्वाक्षऱ्या आढळल्या. त्यांनी पंचनामा केला. ११ मे २०१५ रोजी स्टॉकमध्ये एकही माल उपलब्ध नव्हता. रात्रीला आठ वाजता काटीवरून दलालाच्या घरून ३५ पोती तांदूळ आणले असता नागरिकांनी माल उतरविताना बघितले व मनाई केली. अन्न पुरवठा निरीक्षकांना कळवून दवनीवाडा पोलिसांत तक्रार केली. पण पुरवठा निरीक्षक यांनी दुसऱ्या दिवसी तक्रारीची काहीही दखल घेतली नाही. पोलिसांना तक्रार करूनही धान्य दुकानदारावर कारवाई करण्यात आली नाही.तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, दलाल व दुकानदार यांची साठगाठ असल्याने प्रकरण दाबण्यात येत आहे, असा आरोप वंचित लाभार्थ्यांनी केला आहे. शासन एकीकडे गरिबांना धान्य स्वस्त दरात देणे व कोणीही गरजू गरीब उपाशी राहू नये, असे सांगते. तर दुसरीकडे शासनाचे अधिकारी गरिबांचे अन्न दलालामार्फत देतात व जनता दोन महिन्यांपासून उपाशीपोटी काबाड कष्ट करून खुल्या बाजारातून अन्न घेत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत आहे.तहसीलदार, पुरवठा निरीक्षक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी बिजईटोला, देऊटोला, पोलटोला येथील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनी व एपीएलकार्ड धारकांनी केली आहे. (वार्ताहर)
स्वस्त धान्य खुल्या बाजारात
By admin | Updated: May 21, 2015 01:11 IST