गोंदिया : शासनाच्यावतीने खरीप हंगामात आधारभूत हमीभावाने धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येते. त्याच अनुषंगाने रब्बी हंगामातीलही धान खरेदी करता यावा, यासाठी ऑनलाईन पद्धतीने सात-बाऱ्याची नोंदणी सुरू केली आहे. ही नोंदणी येत्या ३० एप्रिलपर्यंत करावयाची असून, नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर घेण्यात येणार आहे.
जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी ७ एप्रिलच्या पत्रानुसार रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये रब्बीचे धान सरकारी आधारभूत किमतीने सोसायटीमध्ये विकण्यासाठी त्यांच्या सात-बाराची नोंदणी ११ ते ३० एप्रिलपर्यंत २०२१ या कालावधीत करावयाचे आहे व धानाची विक्री दिनांक १ मे ते ३० जून २०२१ या कालावधीत केंद्रावर करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांचे सात-बारा १ ते ३० एप्रिल २०२१ या दरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले असेल, त्यांनाच सरकारी धान खरेदी केंद्रावर धान विकता येईल. ज्याचे ऑनलाईन ३० एप्रिल २०२१ पर्यंत झाले नसल्यास, ते सरकारी आधारभूत किमतीवर धान विकू शकणार नाहीत. याची नोंद घ्यावी आणि रब्बीची फसल घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ आपआपल्या तलाठ्यांशी संपर्क साधून सात-बारा घ्यावा व संबंधित सोसायटीमध्ये ३० एप्रिलच्या आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे. मागील पावसाळी हंगामातील सोसायटीने खरेदी केलेला धान अजूनपर्यंत भरडाईसाठी उचललेला नाही. त्यामुळे जिल्हा पणन अधिकारी सात-बारा नोंदणीसाठी १ एप्रिल २०२१ ही तारीख देतात व या आशयाचे पत्र दिनांक ७ एप्रिल २०२१ ला काढले जाते.