देवानंद शहारे गोंदियाजिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २२० हेक्टर क्षेत्रात धानाची रोपवाटिका तयार करण्यात आल्याची नोंद घेतली आहे. अधूनमधून वातावरण ढगाळलेले असते. परंतु १८ जून नंतर पाऊस पडले नाही. यानंतर २७ जूनला पहाटे जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस पडले. त्यामुळे सदर रोपवाटिका जिवंत राहण्यास थोडीफार मदत झाल्याने शेतकरी थोडक्यात सुखावला आहे. गतवर्षी जिल्ह्यात धान पिकाचे सरासरी क्षेत्र एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर होते. एवढ्या क्षेत्रात मागील वर्षी धानाचे पीक लावण्यात आले होते. तर याच्या १० टक्के क्षेत्रात रोपवाटिका तयार करण्यात आली होती. यंदा कृषी विभागाने एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रात जिल्ह्यात भातपीक लागवडीचे नियोजन केले आहे. याच्या १० टक्के क्षेत्रात म्हणजे १९ हजार हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका यंदा तयार होणे अपेक्षित होते. मात्र पाऊस पडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी धानाची रोपवाटिका लावण्यास सध्या अनुत्सुकता दाखविल्याचे दिसून येते. मागील आडवड्यात १८ जून रोजी पाऊस पडला होता. त्यानंतर पाऊस न पडल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. तीव्र उन्ह पडत होते व रोपवाटिकेला पाण्याची गरज होती. त्यामुळे रोपवाटिका नष्ट तर होणार नाही ना? शारीरिक श्रम व आर्थिक फटका सहन करून दुबार पेरणीचे संकट तर ओढावणार नाही? अशा शंकाकुशंकांनी शेतकऱ्यांना पछाडले होते. मात्र २७ जूनच्या पहाटे थोड्या प्रमाणात आलेल्या पावसाने त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. २७ जूनला दिवसभर ढगाळलेले वातावरण होते. मात्र पाऊस सायंकाळपर्यंत पडला नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांना निराशेने घेरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सन २०१३ मध्ये २६ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण २८२४.१ मिमी पाऊस पडले होते. मात्र यंदा २६ जूनपर्यंत जिल्ह्यात ५६३.१ मिमी पाऊस पडले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २,२६१ मिमी पाऊस जिल्ह्यात कमी पडले. याशिवाय यंदा पाऊस कमी प्रमाणात पडण्याची शक्यतासुद्धा कृषी विभागाने वर्तविली आहे. या प्रकारांमुळे काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत धान बियाण्यांची पेरणीसुद्धा केली नाही. मात्र पुन्हा आठ-दहा दिवस पाऊस पडले नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार, ऐवढे मात्र नक्की.
जिल्ह्यात१२ हजार २२० हेक्टरमध्ये रोपवाटिका
By admin | Updated: June 28, 2014 01:06 IST