कपिल केकत (लोकमत विशेष)
गोंदिया : मालमत्ता कर वसुली विभागाच्या धडाकेबाज कारवायांमुळे यंदा नगरपरिषद मागील सर्व रेकॉर्ड मोडणार आहे. नगरपरिषदेला यंदा ११ कोटी तीन लाख रुपयांची मालमत्ता कर वसुली करायचे टार्गेट असून, आतापर्यंत सुमारे चार लाख ४९ हजार ५५ हजार ५७ रुपयांची कर वसुली केली आहे. त्यात मार्चपर्यंत आणखी बम्पर कर वसुली होणार असल्याने, हे वर्ष नगरपरिषदेला चांगलेच भरभराटीचे लाभणार आहे.
नगरपरिषदेला सर्वात डोकेदुखीचे काम म्हणावयाचे झाल्यास मालमत्ता कर वसुली आहे. कधी राजकारण तर कधी मालमत्ताधारकांकडून भांडणतंटे यामुळे नगरपरिषदेची मालमत्ता कर थकबाकी वाढतच गेली आहे. यात शहरातील राजकारण प्रामुख्याने कारणाभूत आहे. परिणामी, यंदा नगरपरिषदेला मागील थकबाकीचे सहा कोटी २२ लाख रुपये तर चालू मागणीचे चार कोटी ८१ लाख रुपये असे एकूण ११ कोटी तीन लाख रुपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे मागील वर्षीही ४० टक्केच्या आतच मालमत्ता कर वसुली झाली होती. त्याचाही फटका यंदा बघावयास मिळत असून, यामुळेच वसुलीची रक्कम ११ कोटींच्या घरात गेली आहे. कर वसुलीचा हा बोझा कमी करण्यासाठी मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी कर अधिकारी तथा उपमुख्याधिकारी विशाल बनकर यांना कुणाचीही गय न करता, वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार कर वसुली विभाग आपल्या कामाला लागला असून, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या ३ तीन महिन्यांत कर वसुलीचा धडाकाच सुरू केला आहे. यामुळे आतापर्यंत चार कोटी ४९ लाख ५५ हजार ५७ हजार रुपयांची मालमत्ता कर वसुली झाल्याची माहिती आहे, शिवाय आता कर विभागाकडे मार्चपर्यंत म्हणजेच आणखी २ महिन्यांचा कालावधी असल्याने यंदा रेकॉर्ड ब्रेक वसुली होण्याची शक्यता आहे.
.....
८९ लाख येणार समायोजनातून
मालमत्ता कर वसुली विभागाला यामध्ये ८९ लाख ४० हजार रुपयांची रक्कम समायोजनातून मिळणार आहे. यामध्ये कृषी उत्पन बाजार समितीचे ७४ लाख रुपये, गौरक्षण सभेचे ९.५० लाख रुपये, नाइस ऑटोचे २.६५ लाख रुपये तर बँक ऑफ बडोदाच ३.२५ लाख रुपये आहेत. या सर्वांचे प्रस्ताव तयार झाले असून, रक्कम वळती केली जाणार आहे.
--------------------------------
सन २०१६-१७ चा रेकॉर्ड मोडणार
सन २०१६-१७ मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे हे मुख्याधिकारी असताना, त्यांनी स्वत: मैदानात उतरून कर वसुली होती. त्या वर्षी ५१.५८ टक्के म्हणजेच आतापर्यंतची सर्वाधिक वसुली झाली होती. यंदा कर विभागाने ४० टक्के कर वसुली आतापर्यंत करून टाकली आहे. त्यात याच धडाक्याने कर वसुली सुरू राहिल्यास यंदा सन २०१६-१७ मधील रेकॉर्ड मोडला जाणार यात शंका नाही.