गोंदिया : नव्याने घोषित करण्यात आलेल्या सहा नगरपंचायतींचा कामकाज सुरळीत चालावा यासाठी प्रशासकांच्या मदतीला नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले असून त्यानुसार गोंदिया नगरपरिषदेतील पाच तर तिरोडा नगरपरिषदेतील एका कर्मचाऱ्याची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेतील आपले काम सांभाळून नगरपंचायतचे अतिरिक्त काम सांभाळायचे आहे. यासाठी आठवड्यातून दोन दिवस या कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या नगरपंचायतील कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा, गोरेगाव, सडक अर्जुनी व अर्जुनी या सहा तालुकास्थळांना नगरपंचायतचा दर्जा देण्यात आला आहे. दर्जा वाढ झाल्याने येथील ग्राम पंचायतचे कामकाज संपुष्टात आले असून नव्याने नगरपंचायतच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. या नगरपंचायतची नवीन कार्यकारिणी गठित होत पर्यंत तेथील कामकाज बघण्यासाठी तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र तहसीलदारांना नगरपरिषदेच्या कामकाजाचा अनुभव नसल्याने त्यांना हे काम नवखे आहे. शिवाय नगरपंचायतचे काम करण्यासाठी अद्याप नव्याने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. अशात तहसीलदारांना आपल्या कामासोबतच नगरपंचायतचे काम करणे कठीण जात आहे. शिवाय नगरपंचायतसाठीची भरती व निवडणुका कधी होतात हे निश्चीत नाही. अगोदरच नगरपंचायत झाल्यानंतर नागरिकांचे कामे खोळंबत असल्याचे ऐकू येत असून नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत ही कामे व्यवस्थीतपणे होत रहावी व तहसीलदारांना त्यांच्या कामात मदत व्हावी यासाठी नगरपरिषदेतील अनुभवी कर्मचाऱ्यांची तहसीलदारांच्या मदतीसाठी ड्यूटी लावण्यात आली आहे. नगरपरिषदेत कार्यरत या अनुभवी कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेतील कामकाजाचा गाढा अनुभव असल्याने ते नगरपंचायतींमधील कामकाज सुरळीत करतील हा यामागचा दृष्टीकोण आहे. यासाठी निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. (शहर प्रतिनिधी)या सहा जणांची केली निवड जिल्ह्यातील नव्याने घोषित करण्यात आलेल्या नगरपंचायतमध्ये काम करण्यासाठी नगर परिषदेत कार्यरत सहा जणांची निवड करण्यात आली असून तसे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये गोंदिया नगरपरिषदेत कार्यरत रवींद्र लिमये यांना आमगाव नगरपंचायत, सी.ए. राणे यांना गोरेगाव नगरपंचायत, संतोष ठवरे यांना सडक अर्जुनी नगरपंचायत, एम.आर.मिश्रा यांना अर्जुनी नगरपंचायत तर भुपेंद्र शनवारे यांना देवरी नगरपंचायतमध्ये कर्तव्य पार पाडायचे आहे. विशेष म्हणजे या सहा जणांना नगरपरिषदेतील आपले कामकाज सांभाळून ठरवून दिलेल्या नगरपंचायतमध्ये आठवड्यातून दोन दिवस नगरपंचायतला द्यायचे आहेत. पालिकेत अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता पालिकेत आजघडीला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त पडून आहेत. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांकडे दोन-तीन विभागांचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. जास्तीचे काम होत असल्याने अगोदरच कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यात आता त्यांना आठवड्यातून दोन दिवस नगरपंचायतमध्ये जावे लागणार आहे. अशात त्यांची अधिकची डोकेदुखी वाढणार आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे महिन्यातले आठ दिवस. त्यात पहिला व चवथा शनिवार तसेच चार रविवार असे एकूण १४ दिवस होतात. एकंदर अर्धा महिना हे कर्मचारी बाहेर राहतील. तर शहरवासीयांची कामे कशी होणार असा प्रश्न येथे पडतो.
न.प. कर्मचाऱ्यांची नगरपंचायतीत ‘ड्यूटी’
By admin | Updated: March 30, 2015 01:15 IST