एक जानेवारीपासून सुरूवात : आगारांना मिळणार लाखोंची बक्षिसे गोंदिया : एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिलेल्या सूचनेनुसार १ जानेवारी २०१७ पासून एसटी महामंडळामार्फत प्रवासी वाढवा विशेष अभियान राबविण्यात येत आहे. यात अभियानात लाखो रूपयांचे पुरस्कार असून जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारांनी त्यासाठी तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. एसटी प्रवाशांची टक्केवारी सातत्याने घटत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढावी व उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने राज्यातील २५० आगारांच्या पातळीवर या अभियानाची सुरूवात होत आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत चालणाऱ्या या अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारास दरमहा एक लाख रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकावरील आगारास ७५ हजार रूपयांचे व तृती क्रमांकाच्या आगारास ५० हजार रूपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच या अभियानांतर्गत उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावणाऱ्या विभागास ५० हजार रूपयांचे विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे घोषवाक्य घेवून मागील ७० वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवासी दळणवळणाची सेवा देणाऱ्या एसटीला महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ ही बिरूदावली मिळाली आहे. परंतु गेल्या चार-पाच वर्षांत विविध कारणांमुळे एसटीचे प्रवासी एसटीपासून दुरावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर एसटीचा ‘प्रवासी राजदूत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चालक-वाहकांच्या माध्यमातून एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे वळविण्याच्या दृष्टीने ‘प्रवासी वाढवा’ विशेक्ष अभियानाची संकल्पना रावते यांनी मांनडली आहे. त्यासाठी एसटीच्या चालक वाहकांना प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक आगार पातळीवर या अभियान कालावधीमध्ये सर्वाधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहकास दरमहा रोख पाच हजार रूपयांचे बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच त्याला या कामगिरीमध्ये साथ देणाऱ्या चालकाला देखील तीन हजार रुपये रोख एवढे बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. या अभियानामुळे मागील चार-पाच वर्षे एसटीपासून दुरावलेला प्रवासी एसटीकडे वळण्यात सुरुवात होईल, अशी शक्यता एसटीच्या आगार प्रमुखांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
आता ‘प्रवासी वाढवा’ अभियानाची तयारी
By admin | Updated: December 28, 2016 02:31 IST