गोंदिया : गेल्या चार महिन्यांपासून गोंदियावासियांपासून दुरावा ठेवून असलेले खासदार नाना पटोले यांनी अखेर मंगळवारी गोंदियात हजेरी लावली. काही कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्याचे खासदार म्हणून अनेक समस्यांकडे त्यांच्याकडून झालेल्या दुर्लक्षाबद्दल यावेळी त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागला. मात्र आता हा दुरावा ठेवणार नाही, असे म्हणत खा.पटोले यांनी सर्व समस्यांकडे लक्ष देणार, अशी ग्वाही दिली.धान खरेदी, धानाचा हमीभाव, चुकीची पैसेवारी यासह विधानसभा निवडणुकीत गोंदिया मतदार संघात झालेला पराभव, जिल्ह्यातील अनेक समस्यांकडे त्यांचे झालेले दुर्लक्ष यावरून खा.पटोले यांना पत्रकारांनी घेरले. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची बरीच दमछाक झाली.विधानसभा निवडणुकीत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून एकमेव गोंदिया विधानसभा मतदार संघात भाजपला हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा होऊनही ही जागा भाजपने कशी गमावली याची कारणे सांगताना खा.पटोले यांची थोडी तारांबळ उडाली. गोंदिया शहरात आमची स्थिती चांगली असली तरी ग्रामीण भागात पक्षबांधणीत आम्ही कमी पडलो, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळाल्याने गोंदिया मतदार संघात जास्त वेळ देता आला नाही, असेही खा.पटोले म्हणाले. गोंदिया मतदार संघात जातीय समीकरणातून गटबाजी झाल्याचा आरोप फेटाळत येथील उमेदवारही योग्यच होता, असे त्यांनी स्पष्ट केले. धान उत्पादकांना उत्पादन खर्चानुसार भाव मिळावा आणि पैसेवारी काढण्याची कालबाह्य पद्धतही बदलावी यासाठी मागील सरकारच्या काळात नेमलेल्या स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्या म्हणून आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा.पटोले म्हणाले. जिल्ह्यातील अनेक कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांची किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत ती कधी भरणार यावर विचारले असता, येथील लोकप्रतिनिधी आधी चांगल्या व्यक्तींना येथे टिकू देत नव्हते. त्यामुळे पदे रिक्त राहात होती. आता सरकार बदलल्यामुळे यात बदल होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, नगराध्यक्ष कशिश जयस्वाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील सर्व समस्यांकडे आता लक्ष देणार- पटोले
By admin | Updated: November 6, 2014 01:57 IST