अर्जुनी/मोरगाव : स्वच्छता अभियानाच्या तपासणीसाठी गेलेल्या पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेत चिकनवर ताव मारल्याची घटना मंगळवारला (दि.१८) दुपारी जि.प. प्राथमिक शाळा गंधारी येथे घडली. यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार, केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत शाळेत मोहीम राबविली जात होती. या तपासणीकरिता पंचायत समितीतर्फे पथक नेमण्यात आले होते. हे पथक गंधारी येथील प्राथमिक शाळेत भेट देण्यासाठी तिथे पोहोचले. तपासणीदरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोवर्धन पाटणकर यांनी तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणाचा आग्रह केला. उशिर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुद्धा जेवणासाठी संमती दर्शविली. यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांनी मात्र शाळा किंवा शाळा व्यवस्थापन समितीकडे जेवणासाठी आग्रह केला नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी सांगितले.एकूणच या प्रकाराबद्दल शैक्षणिक वर्तुळात चिड व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
शाळेतील मासाहार पार्टीप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना नोटीस
By admin | Updated: November 20, 2014 22:54 IST