अर्जुनी मोरगाव : स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जि.प. गोंदिया, पंचायत समिती अर्जुनी मोरगावअंतर्गत आयोजित करण्यात येत असलेला तालुका शालेय क्रीडा व सांस्कृतिक क्रीडा महोत्सव घेण्यासाठी तालुक्यातील कोणतेच गाव आजपर्यंत पुढे आले नाही. लोकाश्रयातून होणाऱ्या तालुका क्रीडा महोत्सवाला आयोजक मिळत नाही, अशी दुदैवी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जि.प. गोंदियाअंतर्गत अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील ११ केंद्रांमधून डिसेंबर महिन्यात केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव घेतले जातात. गावागावात होणारे हे क्रीडा महोत्सव लोकवर्गणीतून मोठ्या थाटामाटात पार पाडले जातात. क्रीडा महोत्सवाचा सर्व खर्च गावकऱ्यांचा माथी मारून साजरे होणाऱ्या क्रिडा महोत्सवाला अनेकदा हानामारीचे गालबोट सुद्धा लागते. तालुक्यात सर्वत्र सुरू असलेल्या केंद्र क्रिडा महोत्सव पार पाडण्यासाठी आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ११ केंद्रामधून दोन केंद्रांमध्ये क्रीडा महोत्सव घेण्यासाठी कोणतेही गाव पुढे आले नाही असे समजते. अखेर स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला केंद्रामध्ये सामने घेण्याची नामुष्की आली. एका केंद्रामध्ये खेळोत्तेजक मंडळाच्या नाकर्तेपणामुळे व नियोजनाच्या अभावाने तिसऱ्या दिवसाचे अंतिम सामने घेतले नसल्याने बक्षीस वितरण समारंभ होऊ शकला नाही. ११ जानेवारीपासून तालुका क्रीडा महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी सध्या आयोजक पुढे आले नसल्याने तालुक्यावर नामुष्कीची पाळी आलेली दिसते. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे तालुका अध्यक्ष तथा पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांनी तालुक्यातील केंद्रप्रमुख, केंद्राध्यक्ष, केंद्रसचिव, जिल्हा प्रतिनिधी, तालुका उपाध्यक्ष, सचिव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांची तातडीची बैठक घेवून तालुका क्रिडा महोत्सव, घेण्यासंबंधी चर्चा केल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी)
तालुका क्रीडा महोत्सवाला आयोजकच मिळेना?
By admin | Updated: January 1, 2017 01:51 IST